मुख्यमंत्री असल्याचे भान ठेवा; राजकीय भाषणावर अजित पवारांनी खडसावले

विधिमंडळाच्या अधिवेशनांमध्ये राज्याच्या प्रमुखांची भाषणंही क्वचितच राजकीय होती. त्या भाषणामधून एकादाच मुद्दा मांडला जात होता. तर आता मात्र त्या उलट परिस्थिती बघायला मिळत आहे, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली.

अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. त्यावर ‘राईट टू रिप्लाय’ वर (उत्तरावरील अधिकार) बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केली.

यशवंतरावांनीही टीका दिलदारपणे घेतली
मुख्यमंत्र्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, तुमच्यावर टीका होते, मात्र टीका राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावरही आचार्य अत्रे यांनी केली होती. तीही अगदी चव्हाण शब्दातील ‘च’ काढून टाकला तर ‘व्हाण’ राहते अशी जहरी टीका करूनही त्यांनी ती दिलदारपणे घेतली.

राज्याचे प्रमुख आहात
विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना तुम्ही मुख्यमंत्री आहात, राज्याचे प्रमुख म्हणून तुमच्याकडून येथील नागरिकांच्या अपेक्षा आहेत त्या गोष्टीचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला

टार्गेट करणे चुकीचे
तुमच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर द्यायचे तुम्ही द्या, मात्र त्याच वेळी राज्याचे धोरण काय ठरणार, शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही नवीन काय मांडणार त्याकडे लक्ष द्या. तुमच्या वयाच्या मुलांनाच टीका करण्यावरून तुम्ही त्यांना टार्गेट करत आहात आणि ही गोष्ट चुकीची असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रीपद दूर जाईल
अजित पवारांच्या भाषणात सत्ताधारी बाकावरील भरत गोगावले व्यत्यय आणत होते. तेव्हा अजित पवार काहीसे चिडले आणि माझ्या भाषणात जेवढा अडथळा आणाल तेवढे मंत्रीपद दूर जाईल, असे सुनावले.

सुरक्षेची गरज काय….
दरम्यान, अधिवेशनाचे सूप वाजल्यावर अजित पवार यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ३० ते ३५ आमदारांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. एका व्यक्तीच्या वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेवर २० लाख रुपये खर्च येतो. यांना कशाकरिता वाय प्लस सुरक्षा पाहिजे ? ज्यांना गरज असेल त्यांना द्या, असेही अजित पवार यांनी सुनावले.