10 वर्षे मोदी केवळ कॉमेडी करत आहेत! कॉमेडीयन श्याम रंगीलाची टीका; वाराणसीतून अपक्ष लढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे भाजपकडून ट्रोल करून काम मिळणे बंद झालेला राजस्थानी कॉमेडीयन श्याम रंगीला आता नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवणार आहे. गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणात केवळ कॉमेडी करत आहेत. त्यांनी लोकशाही नष्ट करण्याचे काम केले आहे. मी 2014पर्यंत नरेंद्र मोदींचा भक्त होतो. पण गेल्या 10 वर्षांत त्यांनी ज्या पद्धतीने काम केले आहे यामुळे मी पूर्णपणे निराश झालो आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे कॉमेडीयन श्याम रंगीला याने सोशल मीडियावर म्हटले आहे.

श्याम रंगीला याने आपल्या नव्या राजकीय वाटचालीबाबत त्याच्या एक्स अकाऊंटवरून माहिती दिली आहे. रंगीला म्हणाला, मी 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा भक्त होतो. तेव्हा मी पंतप्रधानांच्या बाजूने अनेक व्हिडीओ शेअर केले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात व्हिडीओ शेअर केले होते. पण गेल्या 10 वर्षांत परिस्थिती बदलली असून माझ्यावर नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवायची वेळ आली आहे.

लोकशाही धोक्यात येऊ नये म्हणून रिंगणात

लोकसभा निवडणुकीत कोण कधी उमेदवारी अर्ज मागे घेईल काही सांगता येत नाही. त्यामुळेच मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. इथे लोकशाही धोक्यात येऊ दिली जाणार नाही, हे सांगण्यासाठी मी तरी तिथे असेन. वाराणसीच्या लोकांना मतदानाचा पर्याय मिळेल. सुरत आणि इंदूरसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेणार आहे. आठवडाभरात मी वाराणसीला जाऊन नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांच्याप्रमाणे मी तिथल्या जनतेला खोटी आश्वासने देणार नाही, असेही श्याम म्हणाला.

मी खरोखरच फकीर आहे

मी ईडी, सीबीआय यांना घाबरत नाही. माझ्या अकाऊंटमध्ये काहीही मिळणार नाही. मी खरोखरच फकीर आहे, जो झोला घेऊन चालू शकतो. मी 2017पर्यंत मोदींना खूप मानत होतो, त्यांचा भक्तच होतो. मात्र नंतर माझ्या नक्कल करण्यावरही जेव्हा बंधने आली तेव्हा मला ते पटले नाही. त्यामुळे मी आता मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहे, असे श्याम म्हणाला.