सिद्धू म्हणे तेंडुलकरपेक्षा कोहलीच सर्वोत्तम

राजकारणातील फटके सहन केल्यानंतर तीन वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर क्रिकेटच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचण्याआधी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरपेक्षा किंग विराट कोहली सर्वोत्तम असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करून आपल्याकडे साऱयांचे लक्ष वेधण्याची नको ती उठाठेव सुरू केली आहे.

सिद्धूने समालोचनासाठी हातात माईक घेताच नाहक वादाला खतपाणी घालणारे वक्तव्य केले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यापेक्षा विराट कोहलीला सर्वोत्तम हिंदुस्थानी फलंदाज म्हणण्याचे धाडस सिद्धूने दाखवले आहे. आयपीएल 2024 ची फटकेबाजी सुरू होण्यापूर्वीच सिद्धूने ही वायफळ बडबड करत नको त्या वादाला जन्म देण्याचा प्रयत्न करत आपले पुनरागमन वादग्रस्त केले आहे.

गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानला जबरदस्त क्षमता असलेले खेळाडू लाभले आहेत. या खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कोण आहे? याबाबत सिद्धूने आपले मत व्यक्त करताना तिन्ही क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे नेतृत्व करणाऱया विराट कोहलीला आपले मत दिलेय. गावस्कर आणि तेंडुलकरला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करता आलेले नाही. त्यामुळे तिन्ही फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानला घवघवीत यश मिळवून देणारा विराटच सर्वोत्तम आहे.

विराट कोहली सर्वोत्तम का आहे हे सिद्धू यांनी स्पष्ट केले. विराट कोहलीने तिन्ही फॉरमेटमध्ये हिंदुस्थानी संघाने नेतृत्व केले आहे, जे सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांना करावे लागले नाही. यामुळे सिद्धू विराटला सर्वोत्तम मानतात. सिद्धू म्हणाला की, ‘मी विराटला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट हिंदुस्थानी फलंदाज मानले आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध सुनील गावसकर यांची फलंदाजी ऐकण्यासाठी मी माझे ट्रान्झिस्टर लावून बसायचो. सुनील गावसकर यांनी 15-20 वर्षे वर्चस्व गाजवले. त्यानंतर सचिन आला.  आणखी एक युग सुरू झाले. त्यानंतर धोनी आला आणि मग विराट. या चौघांमध्ये मी विराटला सर्वोत्तम मानतो,’ असे सिद्धू एका पाक्षिकाशी बोलताना म्हणाला. त्याने विराटच्या फिटनेसचेही विशेष काwतुक केले. तो तांत्रिकदृष्टय़ा सर्वात पुढे आहे, सोबत त्याच्या फिटनेसशी कुणाची तुलना होऊच शकत नाही. या चौघांमध्ये तोच सर्वात फिट आहे. सचिनला आपल्या क्रिकेट कारकीर्दीत फिटनेसच्या काही अडचणी आल्या. धोनी आजही फिट आहे, मात्र विराट सुपरहिट आहे. यामुळे तो चौघांत चार पावले पुढे असल्याचे सिद्धू म्हणाला.