इंडिगोप्रकरणी डिजीसीएचे चार अधिकारी निलंबित, केंद्र सरकारची मोठी कारवाई

इंडिगो प्रकरणानंतर केंद्र सरकारने प्रथमच वरिष्ठ सरकारी अधिकाऱयांवर मोठी कारवाई केली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयातील (डिजीसीए) चार वरिष्ठ अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. हे अधिकारी फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर्स म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्यावर नियमन, सुरक्षा देखरेख, विमान कंपनीच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असते. दरम्यान, आजही इंडिगोची 150 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून इंडिगोचा मोठा गोंधळ झाला होता. सरकारने कारवाईचा पहिला भाग म्हणून इंडिगोच्या उड्डाणांमध्ये 5 टक्के कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता डिजीसीएतील अधिकाऱयांवर कारवाई करण्यात आली आहे. ऋष राज चॅटर्जी, सीमा झमनानी, अनिलकुमार पोखरियाल आणि प्रियम कौशिक या अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे.

अतिआत्मविश्वास नडला – कॅ. गोपीनाथ

देशातील पहिली स्वस्तातील विमान सेवा ‘एअर डेक्कन’ सुरु करणारे कॅप्टन गोपीनाथ यांनी इंडिगोवर कडाडून टीका केली आहे. कंपनीने नव्या नियमांसाठी योग्य नियोजन केले नव्हते. तसेच पुरेसे वैमानिक कंपनीकडे नव्हते. नफेखोरीसाठी इंडिगोने वैमानिक व इतर कर्मचाऱयांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले, असे कॅ. गोपीनाथ म्हणाले.

सरकारचे वर्षभर भाडय़ावर नियंत्रण शक्य नाही

इंडिगोच्या गोंधळानंतर इतर विमान कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले होते. त्यावर अखेर सरकारने नियंत्रण आणले. मात्र, संपूर्ण वर्षभर विमान प्रवास भाडे नियंत्रित ठेवणे सरकारला शक्य नाही, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी लोकसभेत स्पष्ट केले. कोविड महामारीसारख्या काळात सरकारने भाडे नियंत्रित ठेवले होते. मात्र सणासुदीच्या वेळी प्रवासभाडे वाढते, असेही नायडू म्हणाले.