बंगळुरूत डिनर डिप्लोमसी; एकीची वज्रमूठ‘गेम चेंजर’ ठरणार!

ईडी, सीबीआय यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून देशात हुकमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या  भाजप विरोधात देशपातळीवर विरोधकांची एकजूट उभी राहत आहे. या एकजुटीचे वादळ सोमवारी बंगळुरूत घोंघावले, पाटण्यानंतर बंगळुरूत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत तब्बल 26 पक्षांचे नेते एकत्र आले. कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
विरोधकांची ही एकजूट 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.

  भाजपला धडकी भरवणारी विरोधकांची बैठक आज बंगळुरूमध्ये यशस्वीरित्या पार पडली. ‘यूनायटेड वुई स्टँड’ या बॅनरखाली हिंदुस्थानातील 26 पक्ष यावेळी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. देशात हुकुमशाही पद्धतीने राजकारण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपचा कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करायचा असा निरधार करून देशभरातील छोटे-मोठे राजकीय पक्ष एकत्र येत आहेत. बंगळुरूमध्ये दोन दिवसीय बैठकीच आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत भाजपाविरोधात रणनीती आखण्यात आली. किमान समान कार्यक्रम, लोकसभेत जागावाटपासह विविध मुद्यांवर खल झाला. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत राहिलेल्या मुद्यांवर अंतिम चर्चा होणार आहे. विरोकांच्या एकजुटीमुळे सत्ताधारी भाजपला जोरदार हादरा बसला असून विरोधकांची ही एकीची वज्रमुठ निश्चित गेमचेंजर ठरेल असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

बंगळुरूत विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे भाजपाची झोप उडाली असून आता त्यांना एनडीए आठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता एनडीएत प्राण फुकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला जयराम रमेश यांनी भाजप नेत्यांना लगावला.

मोदींनी 30 पक्षांची नावे सांगावीत

पंतप्रधान नरेंद्र यांनी ते सर्व विरोधी पक्षांवर एकटेच भारी पडतील असे राज्यसभेत म्हटले होते. मग, आता 30 पक्षांना का एकत्र आणत आहेत? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. पंतप्रधान जे 30 पक्ष आपल्यासोबत आहेत त्यांची नावे सांगावीत, असे आव्हानही दिले. आमच्यासोबत जे पक्ष आहेत ते आमच्यासोबतच राहातील. आम्ही सर्व विरोधी पक्षांनी संसद आणि संसदेबाहेर एकत्र काम केले आहे. आम्ही सध्या जे करत आहोत, ते पाहुन ते बावचळून गेले आहेत, अशी टिकाही खरगे यांनी केली.

बैठकीत कुठले मुद्दे अजेंडय़ावर

  • राष्ट्रीय पातळीवर भक्कम एकजूट दिसण्यासाठी आघाडीला नवे नाव  समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यासाठी उपसमितीची स्थापना
  • लोकसभेसाठी आघाडी करताना संवादाचे मुद्दे निश्चित करणे
  • संयुक्त कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी उपसमितीची स्थापना करणे. सभा, अधिवेशने, आंदोलने यांचा त्यात समावेश असेल.
  • राज्यवार जागावाटप कसे करायचे यावर चर्चा.
  • ईव्हीएमच्या मुद्यावर चर्चा करून निवडणुक आयोगाला सुचना करणे नव्या आघाडीत सुसुत्रता राखण्यासाठी पेंद्रीय चिटणीस कार्यालय उभारणे

शरद पवार आज बंगळुरूला जाणार

बंगळुरूत  विरोधी पक्षांच्या सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजच्या बैठकीला उपस्थित राहु शकले नाहीत. मात्र, उद्या मंगळवारी ते  बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ट्वीटद्वारे त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

  • देशपातळीवरील नव्या आघाडीच्या नावाची आज संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा होणार.
  • शरद पवार बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आज बंगळुरूला जाणार.
  • लोकसभेचे जागा वाटपाचे सूत्र, समान किमान कार्यक्रम ठरणार