डोंगरीत 40 लाखांच्या एमडीसह महिला ड्रग्ज तस्कर सापडली

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने डोंगरीत एका ड्रग्ज तस्कर महिलेला एमडी ड्रग्जच्या साठय़ासह रंगेहाथ पकडले. त्या महिलेकडून 200 ग्रॅम एमडी, वजन काटा व 30 प्लॅस्टिक झिपलॉक बॅग असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आझाद मैदान युनिटचे पथक डोंगरी परिसरात गस्त घालत असताना वाडीबंदर येथील मध्य रेल भंडार बस स्टॉपजवळ एक महिला संशयास्पद हालचाल करताना दिसली. पथक तिच्या जवळ जाताच तिने पोलिसांना बघून पळ काढला. ती पळू लागताच पोलिसांनी पाठलाग करून तिला पकडले. तिची झडती घेतली असता तिच्याजवळील पिशवीत 200 ग्रॅम एमडी, वजन काटा आणि 30 प्लॅस्टिक झिपलॉक बॅग असा मुद्देमाल मिळून आला. दरम्यान, कांदिवली युनिटने वांद्रे येथे दोघा तरुणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पकडले. त्या दोघांकडे पाच लाख किमतीचे 50 एल एसडी डॉट्स पेपर, आठ ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा असा 5 लाख 80 हजार किमतीचा ड्रग्जचा साठा हस्तगत करण्यात आला.