दुलीप करंडकात दक्षिणायन, दहा वर्षांनंतर दक्षिण विभागाने पटकावले जेतेपद

चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान असे स्टार खेळाडू पश्चिम विभागात असतानाही दक्षिण विभागाने दुलीप करंडकावर आपले नाव कोरले. तब्बल दहा वर्षांनंतर दक्षिण विभागाने दुलीप करंडकात बाजी मारताना गतविजेत्या पश्चिम विभागाचा 75 धावांनी पराभव केला.

काल 5 बाद 182 धावांवर असलेल्या पश्चिम विभागाला विजयासाठी आणखी 116 धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात अर्धा संघ होता. दक्षिण विभाग आणि विजयामध्ये कर्णधार प्रतीक पांचाल भिंतीप्रमाणे उभा होता; पण आज तो संघासाठी फारसा काही करू शकला नाही. दिवसाच्या पहिल्या सत्रातच पश्चिम विभागाचा अर्धा संघ 40 धावांत आटोपला आणि दक्षिण विभागाने दहा वर्षांनंतर दुलीप करंडक जिंकण्याचा पराक्रम केला आणि आपले चौदावे अजिंक्यपद संपादले. 2012-13 साली ते उत्तर विभागाबरोबर संयुक्त विजेते ठरले होते.

स्टार आणि दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत पश्चिम विभाग आपले जेतेपद राखेल असा सर्वांनी विश्वास होता. त्यातच प्रियांक पांचालने जबरदस्त फलंदाजी करत संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते. मात्र आज सकाळी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. प्रियांक आपल्या धावसंख्येत केवळ 3 धावांची भर घालून कावेरप्पाचा बळी ठरला. त्यानंतर साई किशोरला आपल्या फिरकीवर पश्चिम विभागाचे शेपूट गुंडाळायला फारसा वेळ लागला नाही. त्याने तीन फलंदाजांना बाद करत जेतेपदावर दक्षिण विभागाचा कब्जा केला. कौशिकने 25 षटकांत 36 धावांत 4 विकेटस्, तर साई किशोरने 57 धावांत 4 विकेटस् घेतल्या. पहिल्या डावात 53 धावांत 7 विकेटस् टिपणारा विद्वत कावेरप्प ‘सामनावीर’ ठरला आणि मालिकेत 15 विकेटस् घेत मालिकावीराचा पुरस्कारही त्यानेच जिंकला.