यवतमाळमध्ये शेतकऱयाने मृत्यूला कवटाळले

छत्रपती संभाजीनगरमध्ये  दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणाला पंटाळून  एकाच दिवशी तीन शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता यवतमाळमध्ये आणखी एका 33 वर्षीय शेतकऱयाने शेतातच विष पिऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना आज सकाळी घडली. संपूर्ण ऑगस्ट कोरडा गेला. आता सप्टेंबरमध्येही वरुणराजा कृपा करत नसल्याने शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात आणखी अडकत चालल्याचे चित्र सध्या आहे.

प्रवीण शायनिक काळे (33) असे या शेतकऱयाचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील हिवरी गावचा राहिवाशी आहे. प्रवीणच्या नावावर अर्जुनी शिवारात 4 एकर शेती आहे. आज सकाळी तो आणि त्याची पत्नी शेतात औषध फवारणीसाठी गेले होते.  प्रवीणची बायको पंप सुरू करण्यासाठी पाणी आणायला गेली. त्यावेळी शेत शिवारातच प्रवीण तणनाशक विषारी औषध प्याला. त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आईवडील, दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.

विदर्भात तीन वर्षांत 4322 शेतकऱयांच्या आत्महत्या

विदर्भात गेल्या तीन वर्षांत तब्बल 4 हजार 322 शेतकऱयांनी मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले आहे. यात अमरावती विभागात 3 हजार 369 आणि नागपूर विभागात 953 आत्महत्या झाल्या.