पहिला नंबर ऑस्ट्रेलियाचाच, वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ जाहीर

सहाव्यांदा आयसीसी वर्ल्ड कप जिंकण्याचा भीमपराक्रम करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या 18 सदस्यीय संभाव्य संघाची निवड केली आहे. या संघातील काही खेळाडूंची नावे पाहून क्रिकेटप्रेमींना धक्का बसला असला तरी हा संघ आधी दक्षिण आफ्रिका दौरा आणि त्यानंतर हिंदुस्थानचा 1 दौरा करणार असून ज्या खेळाडूंची जोरदार कामगिरी असेल अशा 15 खेळाडूंचा अंतिम संघ वर्ल्ड कपसाठी निश्चित केला जाणार आहे. आता ऑस्ट्रेलियाचे पाहून अन्य संघही आपापले संघ जाहीर करायला सुरुवात करतील.

अननुभवी हार्डी आणि सांघा संघात

वर्ल्ड कपसाठी साधारणतः यशस्वी आणि अननुभवी खेळाडूंची निवड केली जाते, पण ऑस्ट्रेलियन निवड समितीने आपला संभाव्य संघ निवडताना एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या फिरकीवीर तन्वीर सांघा आणि अननुभवी एरॉन हार्डीचाही संघात समावेश केला आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये खणखणीत फलंदाजी करणाऱ्या मार्नस लाबुशेनला संघाबाहेर ठेवून सर्वांना धक्का दिला आहे.

ऑस्ट्रेलिया नंबर वन

वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून फक्त आणि फक्त ऑस्ट्रेलियाचेच नाव घेतले जाते. हाच एकमेव संघ आहे, ज्याने 60 टक्क्यांपेक्षा अधिक सामने खेळले आहेत. सात वेळा अंतिम फेरीत धडक मारणारा (1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2015) हा एकमवे संघ आहे. विशेष म्हणजे या सातपैकी केवळ 1975 आणि 1996 या दोन अंतिम सामन्यांतच त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ पॅट कमिन्स (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन एगर, ऍलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, एरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रव्हिस हेड, जोश इंगलीस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर सांघा, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.