
गणेशोत्सवात मातीच्याच मूर्तींची स्थापना करण्याच्या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनावर संबंधित सर्व पक्षकारांची लवकरच बैठक होणार असून राज्य सरकारच्या भूमिकेनंतर न्यायालयात सविस्तर युक्तिवाद करू, अशी माहिती गणेश मंडळांच्या वतीने आज हायकोर्टात देण्यात आली. न्यायालयाने याची दखल घेत याचिकेवरील सुनावणी पुढील आठवडय़ापर्यंत तहकूब केली.
पीओपी मूर्ती आणि सीपीसीबीच्या बदलत्या भूमिकेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले असून या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी अखिल सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर यांनी युक्तिवाद केला.
त्यांनी खंडपीठाला सांगितले की, मातीच्याच मूर्तींची स्थापना करण्याच्या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनावर मंत्रालयात बैठक होणार असून, सरकार पीओपीबाबत काय निर्णय घेणार आहे याची माहिती मिळाल्यानंतर आपली भूमिका न्यायालयात मांडण्यात येईल.



























































