Ganeshotsav 2023 – वाजतगाजत गणराय आले! गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ

सनईचे मंगलसूर, रांगोळ्यांच्या पायघड्या ढोल ताशांचा गजर आणि लक्ष लक्ष मुखांतून होणारा ‘गणपती बाप्पा मोरया…. मंगलमूर्ती मोरया.. ‘चा जयघोष.., आनंद, चैतन्य अशा प्रसन्न वातावरणात लाडक्या गणपती बाप्पांचे वाजतगाजत सर्वत्र आगमन झाले. वरुणराजानेही सकाळी हलका शिडकावा करीत बाप्पाचे स्वागत केले. दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठा सुरुवात झाली.

गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची गणेशभक्त आतुरतेने वाट बघत होते. मंगळवारी गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात  आली. उकडीच्या मोदकांचा आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्यात आला. घरोघरी गणपती अथर्वशीर्ष, गणेशस्तवन यांचे पठण करण्यात आले. पहाटे ४ वाजल्यापासूनच गणेश प्रतिष्ठापनेचा मुहूर्त असल्यामुळे घरोघरी बाप्पांच्या पूजनाची लगबग दिसत होती. बालचमू, वयोवृद्ध मंडळीही बाप्पाच्या आगमनाने आनंदून गेली. मानाच्या गणपतीबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची विधिवत वाजतगाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच मानाच्या गणपतीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली. मानाच्या पाच गणपतीबरोबरच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडईचा शारदा गजानन, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, बाबू गेनू या गणपतीला तोरण अर्पण करण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. गणपती देखावे पाहण्यासाठी  पहिल्याच दिवशी भाविकांनी गर्दी केली होती.