ICC Women’s T20 World Cup 2024 : वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी हिंदुस्थान भिडणार पाकिस्तानला

आयपीएल, पुरुषांचा टी-20 विश्वचषक आणि त्यानंतर लगेच महिलांच्या टी-20 विश्वचषकाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेटवेड्या चाहत्यांसाठी पुढील काही महिने आनंदाचे आहेत असच म्हणावं लागेल. महिलांचा टी-20 विश्वचषक बांग्लादेशमध्ये खेळवला जाणार आहे. विश्वचषकामध्ये होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक ICC द्वारे जाहीर करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिलांच्या टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बांग्लादेशमध्ये होणाऱ्या या विश्वचषकाचे उद्घाटन 3 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लडविरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये होईल. या विश्वचषकामध्ये 10 संघ विजेतेपदासाठी आपापसात भिडणार आहे. त्यांची विभागणी गट-अ आणि गट-ब अशा दोन गटांमध्ये करण्यात आली आहे.

टीम इंडियाचा समावेश गट-अ मध्ये करण्यात आला आहे. गट-ब मध्ये टीम इंडिया व्यतिरिक्त ऑस्ट्रोलिया, न्युझीलंड, पाकिस्तान आणि क्वालिफायर-1 यांचा समावेश असणार आहे. तर गट-ब मध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका आणि क्वालिफायर-2 यांचा समावेश असणार आहे. हिंदुस्थानचा पहिला सामना 4 ऑक्टोबर रोजी न्युझीलंड विरुद्ध होणार आहे. दुसरा सामना 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान, तिसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी क्वालिफायर-1 आणि गटातील शेवटचा सामना 13 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रोलियाविरुद्ध होणार आहे.

दोन्ही गटांमधून अव्वल दोन संघ उपांत्यपुर्व फेरी साठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचा पहिला सामना 17 ऑक्टोबर रोजी तर दुसरा सामना 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी ढाका येथे खेळवला जाईल. एकूण 23 सामने 19 दिवसांमध्ये खेळवले जाणार असून सर्व सामने ढाका आणि सिलहाट या ठिकाणी खेळवण्यात येतील.