भाजपच्या सरपंचाचा स्मशानभूमी घोटाळा; अंत्यसंस्कारासाठी आणलेली लाकडे बेकरीला विकली

स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओएनजीसी कंपनीकडून घेतलेली लाकडे न्हावे गावचे तत्कालीन भाजपच्या सरपंचांनी एका बेकरी व्यावसायिकाच्या घशात घातली आहेत. विशेष म्हणजे ही लाकडे घेतल्याची कोणतीही नोंद ग्रामपंचायतच्या दप्तरी नाही. मात्र ओएनजीसी व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीने केलेल्या विनंतीनुसार या लाकडांचा पुरवठा केला आहे. माहितीच्या अधिकारात या स्मशानभूमी घोटाळ्याचा गौप्यस्फोट झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रायगड जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

भाजपचे वर्चस्व असलेल्या न्हावे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे यांनी स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओएनजीसी कंपनीकडे लाकडांची मागणी केली होती. त्यानुसार ही लाकडे ओएनजीसीने पाठवली. मात्र ती स्मशानभूमीत न येता परस्पर दुसऱ्याच ठिकाणी गेली. त्यामुळे याबाबत सामाजिक कार्यकर्ते वैभव म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली. मात्र अशी कोणतीच लाकडे मागवली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर वैभव यांनी ओएनजीसी प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली आणि हरिश्चंद्र म्हात्रे यांचा स्मशानभूमी घोटाळा उघड झाला. सरपंचांनी 23 डिसेंबर 2021 रोजी लाकडांची मागणी केली होती. हा प्रस्ताव ओएनजीसीने मंजूर केल्यानंतर लाकडे तोडण्याची परवानगी मीनाक्षी पाटील, लक्ष्मण निरगुडा, देऊ निरगुडा, आयुष पाटील यांच्यासह सात लोकांना देण्यात यावी, असे पत्र ग्रामपंचायतीने दिले होते.

सखोल चौकशी करा

ओएनसीसीने अंत्यसंस्कारासाठी पाठवलेली लाकडे स्मशानभूमीत न येता भाजपच्या पदाधिकारी मीनाक्षी पाटील यांच्या बेकरीमध्ये गेली. हा सर्व प्रकार ग्रामपंचायत प्रशासनाला अंधारात ठेवून करण्यात आला. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी. स्मशानभूमीच्या लाकडांचा असा कधीपासून परस्पर अपहार सुरू आहे याचाही शोध घेण्यात यावा, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राघो म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.