मुलांच्या हल्ल्यातील जखमी पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू, ‘लग्न करून द्या’ म्हणत केले होते वार

वडगाव कोल्हाटी येथील 48 वर्षीय पित्यावर ‘लग्न का लावून देत नाही’ असे म्हणून मुलांनी थेट चाकूहल्ला केला. या चाकूहल्ल्यात जखमी पित्याचा आज गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी संपत लक्ष्मण वाहुळ (48) यांना मुलांनी शिवीगाळ सुरू केली. त्यावर संपत यांनी विचारणा केल्यावर ‘तुम्ही आम्हाला शेती वाटून का देत नाही तसेच आमचे लग्न का लावून देत नाही…’ असे म्हणत मारहाण सुरू केली. तसेच थेट चाकूहल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार 8 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता समोर आला होता. या चाकूहल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले होते.

संपत यांनी बचाव करून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही मुलांनी पकडून मोठ्या मुलाने थेट चाकूहल्ला करून जखमी केले. त्यानंतर हा आवाज ऐकून परिसरात राहणारे भाऊ, पुतण्या मदतीला धावून आले. त्यांनी दोन्ही मुलांच्या तावडीतून सोडवून घेत संपत वाहुळ यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. या चाकू हल्ल्याप्रकरणी पोपट संपत वाहुळ व प्रकाश संपत वाहुळ या दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी ताब्यात

दरम्यान, संपत वाहुळ हे मुलांनी केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान आज गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणी मुलांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणारा एक मुलगा पोलिसांच्या ताब्यात दुसऱ्याचा एकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी दिली.