पुण्यानंतर नागपुरातही ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’, मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले; 3 महिन्यांच्या बाळाची प्रकृती चिंताजनक

पुण्यातील हिट अॅण्ड प्रकरण गाजत असतानाच नागपुरातील वर्दळीच्या महाल परिसरात झेंडा चौकाजवळ मद्यधुंद कारचालकाने तीन जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तीन महिन्यांचे बाळ गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

कारचालक आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. कारमधील एकाला जमावाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तर इतर दोघे पसार झाले आहेत. संतप्त जमावाने कारची तोडफोड केली.

दाम्पत्य त्यांच्या तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन पायी चालत होतं. झेंडा चौकात त्यांना कारने धडक देऊन उडवले. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा वर्दळीचा भाग आहे. अपघात झाला तेव्हाही या भागात वर्दळ होती. तरीही बेदरकारपणे भरधाव कार चालवल्याने हा अपघात झाला.

पुण्यातील घटनेनंतर तशीच घटना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात घडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचेच यातून दिसत आहे.

तरुणाला जमावाची बेदम मारहाण
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जमाव संतप्त झाला होता. गर्दीतून दोघेजण पसार झाले मात्र कारमधील एका तरुणाला पकडण्यात यश आले. जमावाने त्याला बेदम चोप दिला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.