BWF Malaysia Masters 2024 : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

हिंदुस्थानची ऑलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिने कोरियाच्या यू जिनविरुद्ध अटीतटीच्या लढतीत 21-13, 12-21, 21-14 असा विजयी मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेल्या सिंधूला हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तिला जिनविरुद्ध विजय मिळवण्यासाठी 59 मिनिटे झुंज द्यावी लागली. कोरियाची यू जिन ही जागतिक क्रमवारीत 34 व्या क्रमांकावर आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर परतणार्या सिंधूची कामगिरी अपेक्षेएवढी झालेली नाही. काही स्पर्धांमध्ये तिला पहिल्या फेरीतच बाद व्हावे लागले आहे. तर काही सामन्यांत तिला बिगरमानांकित खेळाडूंकडूनही पराभव पत्करावा लागला आहे.

हॅनविरुद्ध सिंधू जोरदार

सिंधूला पुढील फेरीत चीनच्या हॅन यूई विरुद्ध लढावे लागणार आहे. हॅनला या स्पर्धेत अव्वल मानांकन लाभले असून या दोघांमधील गेल्या सामन्यात हॅनने सिंधूवर मात केली होती. आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत हा सामना झाला होता. 2022 मध्ये सिंधूने हॅनवर मात करून सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली होती. या दोघींमध्ये झालेल्या सहा सामन्यांत सिंधू  5-1 अशी पुढे आहे.