Bajrang Punia : कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा धक्का, ‘नाडा’ केले निलंबन

हिंदुस्थानचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याचे पॅरिस ऑलंपिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न भंग होऊ शकते. हिंदुस्थानचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याला राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थे (नाडा) ने तात्पुरते निलंबित केले आहे. पूनिया याने मार्चमध्ये सोनीपतमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय निवडी दरम्यान डोपची चाचणी दिली नव्हती, त्यासाठी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. शिवाय निलंबन असेपर्यंत तो कोणत्याच टूर्नामेण्टमध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे 7 मे पर्यंत त्याला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे.

राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) ने 10 मार्च ला बजरंग पुनिया याला चाचणी द्यायला सांगितले होते. मात्र या स्टार रेसलरने असे केले नाही. त्यासाठी नाडाने वर्ल्ड अॅण्टी डोपिंग एजंसी ला याबाबत कळवले. त्यानंतर जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) नाडाला सुचित केले की, बजरंगने चाचणीला नकार का दिला यासाठी नोटीस जारी करुन उत्तर मागविले. अशातच नाडाने 23 एप्रिल रोजी बजरंग पुनियाला नोटीस जारी करुन 7 मे पर्यंत यावर आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. बजरंगने यावर उत्तर दिल्यानंतर सुनावणीची तारीख देण्यात येईल.

पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आयोजित राष्ट्रीय निवड चाचणीत बजरंग पुनियाला पराभवाचा सामना करावा लागला. टोकियो ऑलिम्पिक (2020) कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया याला 65 किलो फ्रीस्टाइल वजन गटाच्या उपांत्य फेरीत कुस्तीपटू रोहित कुमारने पराभूत केले होते. अशा परिस्थितीत 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या त्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

बजरंग पुनिया याच्यावर नाडाने कारवाई केल्यानंतर आता बजरंग पुनिया याने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने म्हंटले की,  ”डोप चाचणीसाठी माझ्याबद्दल येत असलेल्या बातम्यांबाबत मला स्पष्टीकरण द्यायचे आहे!!! मी नाडाच्या  अधिकाऱ्यांना नमुने देण्यास कधीही नकार दिला नाही, मी त्यांना विनंती केली की, त्यांनी माझे नमुने गोळा करण्यासाठी आणलेल्या एक्स्पायर झालेल्या किटवर काय कारवाई केली आणि नंतर माझी डोप चाचणी घ्या. माझे वकील विदुश सिंघानिया योग्य वेळेत या पत्राला उत्तर देतील. अशी प्रतिक्रिया दिली आहे.