T-20 World Cup 2024 : विराटला आऊट करणे हेच माझ ध्येय; पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने बाळगलय उराशी स्वप्न

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणारी लढत पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. मात्र हे कट्टर प्रतिस्पर्धी फक्त आयसीसी आणि आशिया चषक अशा मोठ्या स्पर्धांमध्येच आपापसात भिडताना पाहायला मिळतात. 9 जून रोजी टी-20 विश्वचषकाच्या निमीत्ताने हे दोन्ही संघ न्युयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भिडणार आहेत. अशातच पाकिस्तानच्या एका फिरकीपटूने विराट कोहलीला बाद करणे हे माझे स्वप्न असल्याचे म्हंटले आहे.

विराट कोहलीला बाद करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूचे नाव आहे अबरार अहमद. विश्वचषकापुर्वी पाकिस्तानने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपला संघ जाहिर केला आहे. या संघामध्ये अबरार अहमदचा सुद्ध समावेश आहे. त्यामुळे अबरार आगामी टी-20 विश्वचषकात खेळण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये अबरारने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या माध्यमातून पाकिस्तानी संघात पदार्पण केले होते. “मी सध्या प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रीत करत असून प्रत्येक सामना जिंकण्यावर आमचा भर असणार आहे. तसेच आमच्या संघात अनेक चांगले फिरकीपटू आहेत. त्यामुळे विश्वचषक जिंकण्याचे आमचे ध्येय असले तरी विराट कोहलीला बाद करणे हे माझे स्वप्न आहे,” असे स्थानिक माध्यमांशी बोलताना अबरार अहमदने सांगितले.