IPL 2024 : जडेजा आणि देशपांडेची धारधार गोलंदाजी; चेन्नईने केला पंजाबचा 28 धावांनी पराभव

पंजाबच्या धर्मशाळामध्ये पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने सलग दुसऱ्या विजायाची नोंद केली आहे. चेन्नईने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे फलंदाज अपयशी ठरले. रविंद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी पंजाबच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिले नाही. त्यामुळेच चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यात पंजाबचा संघ अपयशी ठरला आणि 28 धावांनी त्यांचा पराभव झाला.

घरच्या मैदानावर खेळताना पंजाबने चाहत्यांना निराश केले. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत पंजाबने चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीला आलेल्या अजिंक्य रहाणेला अर्शदिप सिंगने 9 या धावसंख्येवर बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकावड (21 चेंडू 32 धावा) आणि मिचेल (19 चेंडू 30 धावा) यांनी केलेली महत्वपुर्ण भागिदारी महत्वाची ठरली. त्यानंतर रविंद्र जडेजाने 26 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 43 धावांची तुफान फलंदाजी केली. चेन्नईने पहिल्या डावात 9 गड्यांच्या मोबदल्यात 167 धावा केल्या आणि 168 धावांचे आव्हान पंजाब समोर ठेवले. पंजाबकडून राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर अर्शदिप सिंगने 2 आणि सॅम करणने 1 विकेट घेतली.

लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबची सुरुवात मात्र खराब झाली. 9 या धावसंख्येवर तुषार देशपांडेने जॉनी बेयरस्टो (7) आणि Rossouw (0) यांना बाद केले. त्यानंतर प्रभासिमरन सिंग (23 चेंडू 30 धावा) आणि शशांक सिंग (20 चेंडू 27 धावा) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळेच पंजाबची अवस्था 8 बाद 90 अशी झाली होती. सतराव्या षटकात ठाकूरने राहुल चहरलच्या स्वरुपात दहावी विकेट घेतली आणि पंजाबचा 28 धावांनी पराभव झाला. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने 3, तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग यांनी प्रत्येकी 2, शार्दुल ठाकूर आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.