गोदरेज समूहाची वाटणी

साबणापासून कुलुपांपर्यंत आणि तेलापासून तिजोरीपर्यंत अशा गृहोपयोगी वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या गोदरेज उद्योग समूहाची अखेर भावंडांमध्ये वाटणी झाली आहे. मालकी हक्काची फेररचना अशा नावाने आदी गोदरेज, नादीर गोदरेज आणि त्यांचे चुलत भाऊ जमशेद व स्मिता गोदरेज यांच्यात गोदरेज समूहातील विविध पंपन्या आणि जमीन आदीची वाटणी झाली आहे.

1897मध्ये स्थापन झालेला हा 127 वर्षांची उद्यमी वाटचाल करणारा नामवंत उद्योग समूह आहे. गोदरेज कुटुंबियांनी परस्पर संमतीने या विभाजनाच्या करारावर शिक्कामोर्तब केले आहे. 82 वर्षीय आदी गोदरेज आणि त्यांचा 73 वर्षीय भाऊ नादीर यांच्याकडे पाच सुचिबद्ध असलेल्या पंपन्या आल्या आहेत. तर त्यांचे चुलत भाऊ 75 वर्षीय जमशेद आणि बहीण स्मिता गोदरेज यांच्या वाटय़ाला सुचिबद्ध नसलेली गोदरेज अँड बॉयस आणि याच्याशी संबंधित इतर पंपन्या तसेच गोदरेज समूहाच्या मालकीची जमीन आली आहे.

गोदरेज समूहाचे निवेदन

गोदरेजचे व्यावसायिक मंडळ दोन गटांत विभागले. यातील चुलत भावंडे जमशेद आणि स्मिता गोदरेज यांच्याकडे गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुप आला आहे. एरोस्पेस, एव्हिएशन ते संरक्षण, फर्निचर आणि आयटी सॉफ्टवेअर अशा अनेक क्षेत्रांमध्ये या पंपन्या सक्रीय आहेत. जमशेद गोदरेज या ग्रुपचे अध्यक्ष असतील तर त्यांची बहीण स्मिता गोदरेज कृष्णा यांची मुलगी न्यारिका होळकर या कार्यकारी संचालक असतील. याशिवाय जमेशद आणि परिवाराकडे मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली 3,400 एकर जमिनीचीही मालकी आली आहे.

गोदरेज इंडस्ट्रीज आदी, नादीर यांच्याकडे

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप हा आदी आणि नादीर गोदरेज यांच्याकडे आला आहे. या ग्रुपमध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ग्रोव्हेट आणि स्टेक लाईफ सायन्सेस या पाच सुचिबद्ध पंपन्या आहेत.