ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँडमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत; मनमोहक आतषबाजीने परिसर उजळला

जगभरात कोरोनाचे सावट असतानाच सर्वजण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जग कोरोना महामारीशी मुकाबला करत आहे. नवीन वर्षात या संकटापासून मुक्ती मिळावी, अशी सगळ्याची इच्छा आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्देश पाळत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.

न्यूझीलँडच्या ऑकलंडपासून नवववर्षाच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे. जगात सर्वात आधी ऑकलंडमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात येते. न्यूझीलंडमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी केलेल्या मनमोहक आतषबाजीने परिसर उजळून निघाला होता. ऑस्ट्रेलियामध्येही नववर्षाचे आतषबाजीने स्वागत करण्यात आले. न्यूझीलंडनंतर ऑस्टेलिया, जपान, दक्षिण कोरिया आणि त्यानंतर हिंदुस्थानात नवर्षाचे आगमन होते.

हिंदुस्थानात ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. काही राज्यात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. तर काही ठिकाणी निर्बंध पाळत नववर्ष साजरे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशातही ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी रोषणाई करण्यात आली आहे.