आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी आज सुरू होताच पुन्हा लांबणीवर गेली. अपात्रतेच्या भीतीने मिंधे गटाने या सुनावणीत खो घातला. मिंधे गटातील आमदारांनी पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केले अशी याचिका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेची कागदपत्रे न मिळाल्याचे कारण सांगत मिंधे गटाने आणखी दोन आठवडय़ांचा वेळ द्यावा अशी विनंती केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी दोन्ही गटांना दहा दिवसांचा वेळ दिला आहे. तसेच त्यानंतर एक आठवडय़ापर्यंत त्या कागदपत्रांसंदर्भात लेखी उत्तर सादर करावे, असे त्यांनी सांगितले.

आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे जवळपास 34 याचिका दाखल झाल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे या याचिकेवर आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला.

आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला असून विधानसभा अध्यक्षांनी आता न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय द्यावा, अशी विनंती यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी केली. त्यावर अद्याप या याचिकेची कागदपत्रेच न मिळाल्याने युक्तिवाद करण्यात अडचण निर्माण झाल्याचे मिंधे गटाच्या वकिलांनी सांगितले.

याचिकेची कागदपत्रे देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांची होती – अजय चौधरी

याचिकेची कागदपत्रे आमच्याकडे मागण्याऐवजी विधानसभा अध्यक्षांकडे मागितली पाहिजे होती. कारण आम्ही नियमानुसार ती त्यांच्याकडे सादर केली होती. ती देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष कार्यालयाची होती, असे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी यांनी सांगितले. आता दहा आणि सात म्हणजे जवळपास तीन आठवडय़ांचा वेळ अध्यक्षांनी पुढे ढकलला, असे चौधरी म्हणाले.

निर्णयासाठी लवकरच प्रतिज्ञापत्र देणार – सुनील प्रभू

सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेबाबत निर्णय घ्या असे सांगितले होते. मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या व्हीपलाही मान्यता दिली होती. याबरोबरच विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निकाल द्यावा, असेही सांगितले होते. त्यानुसार आमच्या वकिलांनी बाजू मांडत अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सुनावणीवेळी सांगितले; परंतु वेळ ढकलण्यासाठी मिंधे गटाने कागदपत्रे मिळाली नसल्याचे कारण सांगितले, असे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू म्हणाले. आम्ही आज अध्यक्षांकडे तत्काळ निर्णय घ्यावा असे प्रतिज्ञापत्र देणार होतो, परंतु काही सुधारणा करून लवकरच आम्ही प्रतिज्ञापत्र देऊ, असे सुनील प्रभू म्हणाले.

कायदा गुंडाळून ठेवण्याचे काम सरकार करतेय – भास्कर जाधव

जे शिवसेनेला सोडून गेले ते नक्कीच घरी जाणार, असा हल्लाबोल आमदार भास्कर जाधव यांनी केला. गेल्या वर्षी 30 जूनला शिवसेनेतील गट पह्डून भाजपने सरकार बनवले. त्यानंतर आम्ही शेडय़ूल 10 प्रमाणे बंडखोर आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करूनही त्यांनी काहीच निर्णय घेतला नाही. भरत गोगावले व्हिप नाहीत असे न्यायालयाने सांगूनही कारवाई केली नाही. सध्याच्या सरकारमध्ये कायदा गुंडाळून ठेवण्याचे काम होत आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही वेळकाढूपणा सुरूच – रवींद्र वायकर

विधानसभेमध्ये आज कोर्ट अवतरले होते. वादी-प्रतिवादी यांनी बाजू मांडली. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही वेळकाढूपणा सुरूच आहे. सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यांचा वेळ दिला आहे, परंतु तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल असे चित्र दिसतेय, असे आमदार रवींद्र वायकर म्हणाले.

सुनावणी झालीच नाही असे म्हणता येईल – पैलास पाटील

खरंतर प्रत्यक्षात सुनावणी झालीच नाही असं म्हणता येईल, असे आमदार पैलास पाटील म्हणाले. सर्व याचिकांचा विषय एकच असल्याने एकत्रित सुनावणी घेऊन पुढील आठवडय़ात निर्णय घ्यावा अशी मागणी आमच्या वकिलांनी केली आहे. आता त्यावरसुद्धा म्हणणे मांडायला शिंदे गटाला भरपूर वेळ दिला जाईल, असे आमदार पाटील म्हणाले.

16 आमदार घरी जाणार – राजन साळवी

सरकारने कितीही वेळकाढूपणा केला तरी मिंधे गटाचे 16 आमदार घरी जातील असा आम्हाला विश्वास आहे, असे यावेळी आमदार राजन साळवी म्हणाले.

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बोलणार नाही – राहुल नार्वेकर

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्यावर अधिक भाष्य करू शकत नाही, असे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार मी सुनावणी घेतोय. विधानसभेचे नियम आणि संविधानातील नियमांचे पालन करून आम्ही योग्य निर्णय घेऊ, असे नार्वेकर म्हणाले.

सुनावणीला हे आमदार उपस्थित होते

मिंधे गट

यामिनी जाधव, भरत गोगावले, बालाजी किणीकर, रमेश बोरणारे, बालाजी किणीकर, संजय शिरसाट, संजय रायमूलकर, सदा सरवणकर, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, शांताराम मोरे, किशोर पाटील, प्रदीप जैस्वाल, विश्वनाथ भोईर, ज्ञानराज चौगुले, दिलीप लांडे, योगेश कदम, प्रकाश सुर्वे, सुहास कांदे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

अजय चौधरी, सुनील प्रभू, सुनील राऊत, राहुल पाटील, संजय पोतनीस, रवींद्र वायकर, वैभव नाईक, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रमेश कोरगावकर, उदयसिंह राजपूत, प्रकाश फातर्फेकर, राजन साळवी, पैलास पाटील, अपक्ष नरेंद्र बोंडेकर.

सरकारकडून वेळकाढूपणा सुरू आहे, शिवसेनेच्या आमदारांमध्ये संताप

आमदार अपात्रतेच्या सुनावणीला विलंब होत रहावा म्हणून मिंधे सरकारकडून सातत्याने काही ना काही कारणे सांगितली जात असल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदारांनी विधान भवनाबाहेर संताप व्यक्त केला.