खतासाठी शेतकऱ्यांची धावाधाव; युरियासाठी पहाटे 4 वाजल्यापासून रांगा, खरीप हंगामाच्या तोंडावर चिंता वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गॅसच्या टंचाईचा सामना करावा लागल्यानंतर आता खरीप हंगामाची तयारी सुरू असताना राज्यभरात खताची टंचाई निर्माण झाली आहे. अकोला जिह्यातील अकोट येथे युरिया खत मिळणे अवघड झाले आहे. खताची गोणी मिळावी यासाठी शेकडो शेतकरी पहाटे 4 वाजल्यापासून कृषी सेवा केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. परिसरात मोठी गर्दी वाढल्याने तणाव निर्माण होत असून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली आहे.

अकोटमधील एका कृषी सेवा केंद्रावर युरियाचा साठा येणार असल्याची माहिती मिळताच शेकडो शेतकरी पहाटे 4 वाजल्यापासून केंद्राबाहेर जमा झाले. शेतकरी खत मिळवण्यासाठी अनेक तास प्रतीक्षा करत होते. मात्र केंद्रावर केवळ 200 पोती युरिया उपलब्ध झाल्याने अनेक शेतकऱयांना खत मिळाले नाही. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. खत न मिळाल्याने विव्रेते आणि शेतकऱयांमध्ये मोठा वाद झाला. परिस्थिती चिघळल्याने घटनास्थळी पोलिसांना बोलावण्यात आले.

देशभरातील शेतकरी संतप्त

युरिया खताची टंचाई ही केवळ महाराष्ट्र राज्यातच नाही, तर पंजाब, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारमध्येही आहे. युरिया टंचाई, काळाबाजार आणि खतासोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली आहेत.

पाच वेळा दर वाढले

शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू असतानाच खताच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मार्च ते जून या कालावधीत खताच्या किंमतीत तब्बल पाच वेळा वाढ झाली आहे. 50 किलोच्या गोणीसाठी 2 हजार 450 रुपये मोजावे लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर 1 हजार रुपये जास्त आहे. ज्या शेतकऱयाकडे पेरणीसाठी पैसे नाहीत. त्या शेतकऱ्यांनी खतासाठी कुठून पैसा आणायचा असा प्रश्न या शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे. बाजारात डीएपी आणि युरिया या दोनच खतांना अनुदान आहे. यात डीएपीची किंमत 1350 रुपये तर युरियाला 265 रुपयांचा दर आहे. या खताच्या तुलनेत अन्य खताचे दर एक हजाराने जास्त आहे.

पेरणीआधी खताची टंचाई

राज्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पुढील आठवडा पेरणीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. पेरणीआधी खताची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. काही भागात खतांच्या साठेबाजीच्या तक्रारी येऊनही त्यावर कारवाई न केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला युरियाची मागणी झपाट्याने वाढते तरीही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.