IND vs WI – ‘पैसा आणि पॉवर असतानाही…’, व्यंकटेश प्रसाद यांनी टीम इंडियाला दाखवला आरसा

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या लढतीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने दिलेले 181 धावांचे वेस्ट इंडिजने 6 गडी राखून पार केले. तत्पूर्वी झालेला पहिला सामना टीम इंडियाने जिंकला, मात्र 115 धावांचे माफक आव्हान पार करतानाही आपली दमछाक झाली. आता तीन सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना 1 ऑगस्टला खेळला जाणार आहे.

दुसऱ्या लढतीतील दारूण पराभवानंतर टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी रोहितसेनेवर हल्लाबोल केला आहे. एकामागोमाग एक ट्विट करत व्यंकटेश प्रसाद यांनी टीम इंडियाला आरसा दाखवला आहे. कसोटी क्रिकेट वगळता अन्य दोन फॉरमॅटमधील टीम इंडियाची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. हिंदुस्थानला बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक दिवसीय मालिका गमवावी लागली. गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही टीम इंडियाने सुमार दर्जाची कामगिरी केली. इंग्लंडच्या संघासारखा उत्साह आणि ऑस्ट्रेलियासारखा आक्रमकपणा आपल्यात दिसत नाही, असे व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटले.

पैसा आणि पॉवर असूनही आपल्याला छोट्या-मोठ्या यशामध्ये समाधान मानायची सवय लागली आहे. आपण एक चॅम्पियन संघ बनण्यापासून कोसो दूर आहोत. सर्वच संघ जिंकण्यासाठीच खेलतात. टीम इंडियाही जिंकण्यासाठीच खेळते. मात्र कालनानुरूप त्यांचा दृष्टीकोण आणि वृत्ती खराब कामगिरीला कारणीभूत आहे, असेही त्यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटले.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळताना टीम इंडियाने खराब कामगिरी केली. ईशान किशन (55) आणि शुभमन गिल (34) वगळता इतर फलंदाज धावांसाठी झगडताना दिसले. आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढणारे फलंदाज वेस्ट इंडिजसारख्या दुबळ्या संघासमोरही तग धरू शकले नाही. यामुळे माजी क्रिकेटपटू कपिलदेव यांनीही टीम इंडियाची खरडपट्टी काढली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)