वायप्रदूषणामुळे नागरिकांचे आयुष्य 5 वर्षांनी कमी होण्याची भीती

वायू प्रदूषणामुळे हिंदुस्थानातील नागरिकांचे आयुष्य 5.3 वर्षांनी कमी होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. दिल्लीतील नागरिकांना वायू प्रदूषणाचा सगळ्यात जास्त त्रास होत असून त्यांचे आयुष्य या प्रदूषणामुळे 11.9 वर्षांनी कमी होण्याची भीती आहे. शिकागो विद्यापीठाच्या उर्जा धोरण संस्थेने  (Energy Policy Institute at the University of Chicago) केलेल्या पाहणीतून ही बाब निदर्शनास आली आहे.  या संस्थेने केलेल्या पाहणीतून हिंदुस्थान हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश असून जगामध्ये दिल्ली हे पहिल्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असल्याचे दिसून आले आहे. दिल्लीप्रमाणेच अवस्था दिल्लीच्या आसपासच्या परिसरातही असल्याचे या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

या संस्थेने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्रदूषणाची स्थिती अशीच राहिली आणि हिंदुस्थानने हवेच्या गुणवत्तेचा दर्जा 40 μg/m3 राखला नाही तर हिंदुस्थानी नागरिकाचे सरासरी आयुर्मान हे 1.8 वर्षांनी, महाराष्ट्रातील नागरिकांचे आयुर्मान 1.2 वर्षांनी तर दिल्लीतील नागरिकांचे आयुर्मान 8.5 वर्षांनी कमी होण्याची भीती आहे. प्रदूषणामुळे गुडगाववासीयांचे आयुर्मान 11.2 वर्षांनी, फरीदाबादवासीयांचे 8.8 वर्षांनी तर प्रयागराजवासीयांचे 4.6 वर्षांनी आयुर्मान कमी होण्याची भीती आहे. देशातील 67.4 टक्के लोकसंख्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा 40 μg/m3 पेक्षा जास्त असलेल्या भागांमध्ये राहते. ज्या भागात हवेच्या गुणवत्तेचा स्तर हा 5 μg/m3 पेक्षा जास्त असतो त्या भागातील लोकांचे आयुर्मान हे 5.3 वर्षांनी कमी होते.