हिंदुस्थानी तिरंदाजांचा 14 वर्षांचा वनवास संपला! ऑलिम्पिक चॅम्पियन कोरियाला हरवून साधला ऐतिहासिक ‘सुवर्ण’भेद

हिंदुस्थानच्या पुरुष तिरंदाजी रिकर्व्ह संघाने अंतिम लढतीत विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन दक्षिण कोरियाचा पाडाव करीत तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरत इतिहास घडविला. धीरज बोम्मदेवरा, तरुणदीप राय व प्रवीण जाधव या त्रिकुटाने तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थान या स्पर्धेत सोनेरी यश मिळवून दिले, हे विशेष. हिंदुस्थानी तिरंदाजांचे या स्पर्धेत रिकर्व प्रकारातील हे पहिलेच सुवर्णपदक ठरल्याने जणू त्यांचा 14 वर्षांचा वनवास संपलाय अशीच ही कामगिरी म्हणावी लागेल. हिंदुस्थानने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पाच सुवर्णांसह दोन रौप्य व एक कांस्य अशी आठ पदकांची लयलूट केली.

धीरज, तरुणदीप व प्रवीण या हिंदुस्थानी त्रिमूर्तींनी शांतचित्ताने अचूक लक्ष्यभेद करताना दक्षिण कोरियापेक्षा सरस खेळ केला. सेनादलातील 40 वर्षीय तरुणदीपने 2010 मध्ये शांघाय विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या चरणात हिंदुस्थानी संघाला सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी केली होती. यावेळी हिंदुस्थाने सुवर्णपदकाच्या लढतीत कोरियाचा 57-57, 57-55, 55-53 असा पराभव केला. यंदाच्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे पाचवे सुवर्णपदक ठरले. पहिल्या सेटमध्ये हिंदुस्थानी तिरंदाजांनी तीन वेळा 10, तर तीन वेळा 9 गुणांची कमाई करीत कोरियाची बरोबरी केली. दुसऱया सेटमध्ये सहापैकी तीन बाणांवर अचूक 10 गुणांचा वेध घेत 57-55 अशी बाजी मारली. पिछाडीवर पडल्यामुळे तिसऱया सेटमध्ये कोरियन तिरंदाज दबावात भरकटल्याने त्यांना केवळ 53 गुणांचीच कमाई करता आली. याउलट हिंदुस्थानी तिरंदाजांनी 55 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. या सुवर्णपदकामुळे हिंदुस्थानने पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी दमदार वाटचाल केली आहे. 2010 नंतर पुरुष संघाचे हे पहिले सुवर्णपदक होय. या सोनेरी यशापूर्वी हिंदुस्थानी महिला संघाने 2013 मध्ये जुलैमध्ये मेडेलिन तिसर्या चरणात, तर ऑगस्टमध्ये व्रोकला चौथ्या चरणात कोरियन संघाला हरविले होते.

अंकिता-धीरज जोडीला कांस्य, दीपिकाला रौप्य
अंकिता भगत व धीरज बोम्मदेवरा या हिंदुस्थानी जोडीने मिश्र दुहेरीत हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून दिले. त्यांनी कांस्यपदकाच्या लढतीत अलेक्झांड्रा वेलेंशिया व मटियास ग्रांडे या मेक्सिकन जोडीचा 6-0 (35-31, 38-35, 39-37) असा पराभव केला. आई बनल्यामुळे खेळापासून प्रदीर्घ काळ लांब राहिलेली हिंदुस्थानची अनुभवी दीपिका कुमारीला रिकर्वच्या वैयक्तिक अंतिम फेरीत पराभूत झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. लिम सिह्योन हिने 6-0 (26-27, 27-29, 27-28) अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले.