IPL 2024 – पंजाबने चेन्नईसुद्धा जिंकले

गुजरात टायटन्सला अहमदाबादेत, कोलकात्याला कोलकात्यात नमवल्यानंतर पंजाबने चेन्नईलाही चेन्नईत नमवत आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. पंजाबने चेन्नईचा 13 चेंडू आणि 7 विकेट राखून सहज पराभव करत गुणतालिकेत 8 गुणांसह सातवे स्थान मिळवले आहे.

चेन्नईच्या 163 धावांच्या आव्हानातला दम जॉनी बेअरस्टॉ आणि रिली रोसॉने 64 धावांची झंझावाती भागी करत काढून टाकला. बेअरस्टॉने 46 तर रोसॉने 23 चेंडूंत 43 धावा ठोकल्या. त्यानंतर सॅम करण (26) आणि शशांक सिंगने (25) चौथ्या विकेटसाठी 50 धावांची अभेद्य भागी रचत पंजाबला सहज विजय मिळवून दिला.

त्याआधी आयपीएलमधील धावांचा पाऊस कायम राखताना चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या 62 धावांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपली कामगिरी चोख बजावता न आल्यामुळे चेन्नईला आपल्या घरच्या मैदानावर 7 बाद 162 धावाच करता आल्या. ऋतुराजने अजिंक्य रहाणेच्या साथीने 64 धावांची सलामी दिली, पण या धावसंख्येत आयपीएलला साजेसा वेग नव्हता. त्यानंतर हिंदुस्थानी संघात स्थान मिळवलेल्या शिवम दुबे (0) आणि रवींद्र जाडेजा (2) या दोघांनीही निराशाजनक खेळ केल्यामुळे चेन्नईला फार मोठा धक्का बसला.

त्यानंतर तळाच्या फलंदाजांनीही सामान्य फलंदाजी केल्यामुळे चेन्नईला धावसंख्येला 162 च्या पुढे नेता आले नाही. हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांनी अत्यंत अचूक मारा करताना 16 आणि 17 धावा देत प्रत्येकी 2 विकेट टिपल्या. रहाणे आणि दुबेला टिपणारा ब्रार ‘सामनावीर’ ठरला.