पराभवाचा मास संपला! एक महिना आणि पराभवाच्या षटकारानंतर बंगळुरूचा विजय

आयपीएलच्या सतराव्या मोसमात पराभवाच्या षटकारानंतर बंगळुरूचा पराभवाचा मास अखेर संपला. बंगळुरूने विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या संथ-वेगवान अर्धशतकामुळे हैदराबादसमोर 207 धावांचे आव्हान ठेवले होते आणि या आव्हानाचा पाठलाग करताना पाच षटकांत हैदराबादचे वादळ शांत झाल्यामुळे बंगळुरूने बरोबर एक महिन्यानंतर 35 धावांनी विजय नोंदवला. हैदराबादला त्यांच्या घरात हरवणारा बंगळुरू पहिला संघ ठरला आहे.

आज विराट कोहलीच्या 43 चेंडूंतील संथ 51 धावा आणि रजत पाटीदारच्या 20 चेंडूंतील आक्रमक 50 धावांच्या खेळ्या, तसेच शेवटच्या षटकांत पॅमरून ग्रीनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूने हैदराबादसमोर 207 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. पण हैदराबादचे आघाडीचे 4 फलंदाज 56 धावांत बाद झाल्यानंतर माफक आव्हान डोंगराएवढे वाटू लागले आणि हैदराबादचा संघ 20 षटकांत 8 बाद 171 पर्यंत मजल मारू शकला. हैदराबादसाठी नेहमीच षटकारांची आतषबाजी करणारे ट्रव्हिस हेड (1), एडन मार्करम (7), हेन्रीक क्लासन (7) हे स्वस्तात बाद झाल्यानंतर हैदराबादसाठी कुणीच उभा राहिला नाही. कर्णधार पॅट कमिन्सच्या 31 आणि शाहबाज अहमदच्या नाबाद 40 धावांनी हैदराबादच्या पराभवाचे अंतर कमी केले.

तत्पूर्वी बंगळुरूने टॉस जिंकताच विराट कोहली आणि फाफ डय़ु प्लेसिसची जोडी मैदानात उतरली आणि दोघांनी 4 षटकांत 48 धावांची दमदार सलामी दिली. फाफने 12 चेंडूंत 25 धावा फटकावत आपली कामगिरी चोख बजावली. मग विल जॅक्स आला तसाच लवकर परतला. मात्र त्यानंतर कोहलीला रजत पाटीदारने 65 धावांची भागी रचली. एकीकडे कोहली एकेरी-दुहेरी धावा काढत असताना पाटीदारने हैदराबादच्या गोलंदाजीला पह्डून काढले. त्याने  5 षटकार आणि 2 चौकार ठोकत 19 चेंडूंत तर कोहलीने 37 व्या चेंडूंवर पन्नाशी गाठली.