ट्रेनमध्ये सुरू होत्या गप्पाटप्पा; सहप्रवाशांचा गैरसमज झाला अन् एकाने गमावला जीव

टिटवाळा आणि वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेत गैरसमजातून झालेल्या वादात एका 55 वर्षीय प्रवाशावर चाकू आणि बेल्टने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दत्तात्रय भोईर असे त्या प्रवाशाचे नाव असून शहापूर तालुक्यातील साजिवली गावातील ते शेतकरी आहेत. 28 एप्रिल रोजी ही घटना घडली असून रविवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या चार मिनीटांच्या व्हिडीओमध्ये मरुण रंगाचा शर्ट घातलेला माणूस पट्टा काढताना तर पांढरा शर्ट घातलेला माणूस जीवघेणा हल्ला करताना दिसला. तर यामध्ये एक माणूस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या घटनेची पुष्टी करताना रेल्वे पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले की, हल्ल्यात जखमी झालेल्या भोईर यांनी प्रथम वाशिंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना आसनगाव येथील क्रिस्टल रुग्णालयात आणि नंतर ठाण्यातील अन्य रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. मात्र गुरुवारी उपचारा दरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. तपासात आढळले की, चार आरोपींनी भोईर यांच्या मित्रांमधील संवादाचा चुकीचा अर्थ लावला. त्यांना वाटले भोईर त्यांची चेष्टा करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईर त्यांचा मित्र प्रदीप शिरोसे आणि इतर दोघांसोबत मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतत होते. हे चौघे जनरल डब्यात बसले होते. यावेळी ते मद्य प्यायल्याने त्यांच्या चर्चा रंगल्या होत्या. ते विनोद करण्यात गुंग होते. मात्र दरवाजाजवळ बसलेला दोन प्रवाशांना त्यांची वर्तणूक खटकली. ते चिडले. त्यांना भोईर आणि त्यांचे मित्र त्यांची खिल्ली उडवत असल्याचे वाटल्याने त्याला जाब विचारायला गेले आणि वाद झाला. त्या व्यक्तीने भोईर यांच्यासह एकाला धक्काबुक्की केली. अशावेळी भोईर यांनी आपला बचाव करण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यांच्या पोटात आणि हातावर चाकूहल्ला केला.

अमोल परदेशी (40) आणि तांजी कुमार जम्मूवाल (21) अशी त्या हल्लेखोरांची नावे आहेत. हल्लेखोरांनी ट्रेन वाशिंदजवळ आल्यानंतर पळण्याचा प्रयत्न केला. मात्र भोईर यांच्या मित्राने मदतीसाठी हाक मारली आणि पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करुनही भोईर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी या घटनेची पुष्टी केली असून गांजा ओढलेल्या आरोपींवर भादंसं कलन 302, 324. 337 आणि 34 अंतर्गत गुम्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीवर यापूर्वीही प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता.