सुरतच्या कंपनीचा मुंबईत मुजोरपणा, मराठी तरुणांनाच नोकऱ्या देणार नसल्याची घोषणा

सुरतच्या एका कंपनीच्या मुंबईतील शाखेत चक्क मराठी तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार नसल्याचे समोर आले आहे. जानवी सारना या तरुणीने लिंक्डइन या नोकऱी देणाऱ्या कंपनीवर टाकलेल्या जाहीरातीत त्यांनी थेट मराठी तरुणांना नोकरी दिली जाणार नसल्याचे नमूद केले आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सदर तरुणीने ती डिलीट केली असून मराठी जनतेची माफी मागितली आहे.

जान्हवी सारना या तरुणीने ग्राफीक डिझायनर पोस्टसाठी नोकरीची जाहीरात दिली होती. एक वर्षाचा अनुभव असलेल्या तरुणांसाठी ही नोकरी होती. सोबत 4.8 लाख रुपये प्रती वर्ष पगार देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. या सोबतच नोकरीच्या पात्रतेमध्ये मराठी तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार नाही असे लिहण्यात आले होते.

याला भाजप जबाबदार, वर्षा गायकवाड यांची टीका

हाच… हाच तो यांचा तोरा जो महाराष्ट्र आणि महाराष्ट्रवासी विरोधी आहे.सुरतची कंपनी मुंबईत नवीन शाखा उघडते, पण त्यांना तिथे मराठी माणूस कामावर नकोय.. याच महाराष्ट्रद्वेषी, मुंबईद्वेषी मानसिकतेबद्दल अगदी सुरुवातीपासून सांगण्याचा, दर्शवण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत… एवढं धाडस या कंपन्यांमध्ये येतो कुठून? याला संपूर्णत: जबाबदार गुजरातप्रेमी भाजप पक्ष आहे. त्यांच्याच मेहेरवर असल्या कंपन्या एवढी मजल मारतात. तोंड वर करून बोलतात. हाच यांचा माज उतरवण्यासाठी आपल्याला एकजुटीनं यांना पराभूत करायचं आहे.. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा स्वाभिमान हा जपला गेलाच पाहिजे.. ज्यांच्या जमिनीवर येऊन कमावता, त्यांचा आदर असलाच पाहिजे. संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.. तसे न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढू, अशी पोस्ट वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे,