शरद पवार यांनी दुटप्पीपणा केलेला नाही; जयंत पाटील यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार दुटप्पी भूमिका घेतात, अशी टीका केली होती. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिले. शरद पवार यांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. शाहू महाराजांना उमेदवारी घ्या म्हणून त्यांच्या मागे आम्ही लागलो होतो. तर उदयनराजेंना मात्र दिल्लीला ताटकळत थांबावे लागले होते. शशिकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे दुटप्पीपणा झालेलाच नाही असे सांगत जयंत पाटील यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शशिकांत शिंदे हे संसदेत 100 टक्के हजेरी लावतील. पूर्ण वेळ उपलब्ध असणारा नेता, 100 टक्के हजेरी लावून आणि प्रश्न विचारू शकणारा उमेदवार आम्ही दिला असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. भाजपचे इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावे लागले, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.