शतकांच्या शतकोत्सवासमीप आयपीएल; यंदाच्या मोसमात नवे विक्रम रचण्याची शक्यता

इम्पॅक्ट प्लेअरच्या प्रयोगाने आयपीएलचे मागील सारे विक्रम मोडीत काढले आहे, हे आता कुणाला वेगळे सांगायची गरज नाही. गेल्या 15 वर्षांत आयपीएलमध्ये शतक ठोकणे खूप मोठी गोष्ट असायची. पण इम्पॅक्ट प्लेअरचा नियम अस्तित्वात आला आणि गेल्या वर्षी सर्वाधिक 12 शतके ठोकली गेली. यावेळी तर 40 सामन्यांतच नऊ शतके साजरी करण्यात आली आहेत. या शतकी झंझावातामुळे आयपीएलच्या 17 मोसमातील शतकांचा आकडासुद्धा 96 वर पोहोचला आहे. त्यामुळे यंदा फलंदाजांनी ‘शतकांचा शतकोत्सव’ साजरा करताना शतकांचे अन्य विक्रमही मोडून काढले तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. शतकी खेळी इतकी सामान्य झाली आहे.

यंदा आयपीएल सुरू झाली तेव्हा पहिल्या 18 सामन्यांत एकही शतक ठोकले गेले नव्हते. मात्र 19 व्या सामन्यांत विराट कोहलीच्या बॅटमधून पहिले शतक निघाले आणि मग शतकांचा अक्षरशः जोरदार पाऊसच सुरू झाला. गेल्या 22 सामन्यांत आठ फलंदाजांनी नऊ शतके ठोकली आहेत. जोस बटलरने यंदा दोन शतके ठोकत संघाला दोन्ही सामन्यांत विजयही मिळवून दिले आहेत. पण आयपीएलच्या इतिहासात दोन्ही डावांत शतके होण्याचा पराक्रम सर्वप्रथम गेल्याच वर्षी घडला होता आणि दोन्ही वेळेला विराट कोहलीचे नाव त्यात होते. आधी हैदराबादविरुद्ध, नंतर गुजरातविरुद्ध त्याच्या बॅटमधून शतक झळकावले गेले आणि या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजानेही शतक साकारले होते. मात्र यंदा फलंदाजांवर इतका जबरदस्त इम्पॅक्ट झाला आहे की, चक्क तीन सामन्यांत दोन्ही डावांत शतके साजरी केली गेली आहेत. यावरून तुम्हाला अंदाज येईल की, आयपीएल किती वेगवान झाले आहे.

आजवर आयपीएलचा इतिहास पाहिला तर पहिल्या 15 वर्षांत एका मोसमात एकदाही दहा शतके ठोकली गेली नव्हती. सर्वाधिक आठ शतके 2022 साली फलंदाजांच्या बॅटमधून निघाली होती. मात्र गेल्या वर्षी इम्पॅक्ट प्लेअरमुळे शतकांचा वेग इतका वाढला की, विक्रमी 12 शतकांची नोंद झाली. यंदा तर शतकांचा वेग पाचव्या गिअरवर आहे. 40 सामन्यांत नऊ शतके झालीत. अजून 34 सामने शिल्लक आहेत. शतकांचा आकडा आणखी किती वाढेल, हे निश्चित सांगता येत नाही, पण शतकांचा आकडा विक्रमी असेल. शतकांच्या या वेगामुळे यावेळी सांघिक धावसंख्या 300 पार जाण्याची दाट शक्यता आहेच. त्याचबरोबर 30 चेंडूंत ठोकलेल्या ख्रिस गेलच्या शतकाच्या विक्रमालाही आव्हान दिले जाऊ शकते. एकाच डावात दोन शतके आजवर 2016 साली बंगळुरूच्या विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या फलंदाजांनीच ठोकली आहेत. या विक्रमाचीही पुनरावृत्ती होऊ शकते. एवढेच नव्हे तर जोस बटलरचा फॉर्म पाहाता तो विराट कोहलीच्या आठ आयपीएल शतकांनाही मागे टाकू शकतो. यंदा त्याने दोन शतके चोपताना आपला आकडा सातवर नेला आहे. बटलरसाठी हे कठीण राहिलेले नाही. आयपीएलवर इम्पॅक्टचा इतका जबरदस्त इम्पॅक्ट आहे की, यंदा काहीही होऊ शकते.