
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात शिक्षकाने केलेल्या लैंगिक छळाविरोधात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर घटनेच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला मात्र हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनादरम्यान काही जणांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. सोपोर येथील एका सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकाने एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठ उर्दू शिक्षक गुलाम हसन मीर यांच्यावर गैरवर्तन आणि लैंगिक छळ करण्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सोमवारी (१३ एप्रिल) त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले, परंतु जमाव वाढत गेल्याने शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनादरम्यान, आंदोलकांनी घोषणाबाजी केली, रस्ते अडवले आणि नंतर तोडफोड केली. यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि नुकसान केल्याच्या आरोपाखाली तपासादरम्यान आतापर्यंत अंदाजे आठ जणांना अटक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, इतर २५ जणांची ओळख पटली असून, या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरु आहे. त्यानंतरच त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. सोपोरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक इफ्तिखार तालिब यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या आधारे, आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, शालेय शिक्षण संचालनालय काश्मीरने हसन मीर यांना निलंबित केले आहे. तसेच हा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली बांदीपोरा येथील बॉईज हायर सेकंडरी स्कूल मध्ये केली आहे. या प्रकरणासाठी नियुक्त केलेल्या तपास अधिकाऱ्याला पुढील १५ दिवसांत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.


























































