“भटकता आत्मा” कशाला म्हणतात हे मराठी माणसं मतदानात दाखवून देतील, जितेंद्र आव्हाड भडकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना अक्षरश: खालची पातळी गाठली. त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत मोदींवर तसेच अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय शरद पवारसाहेब यांना ‘भटकती आत्मा’ असा टोमणा मारला. प्रत्येक मराठी माणसाला भटकती आत्मा या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजतो. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोलले जाते. जीवंत माणूस आणि आत्मा याचा कधी संदर्भच लागत नाही. नेमकं मोदींना म्हणायचे तरी काय होते. बारामतीमध्ये अजित पवार यांनी जे भाषण केले होते; त्यामध्येही ते असेच म्हणाले होते की,”यांचे शेवटचे भाषण कधी होणार; हेच कळत नाही.” मोदीही असेच काहिसे बोलून गेले. ते पवारसाहेबांच्या मृत्युची वाट पहात नाहीत ना? असा सवाल त्यांनी या पोस्ट मधून केला आहे.

”पवारसाहेब यांना एवढं घाबरायचे कारण काय? ‘मोदींनी शरद पवार साहेब यांना भटकती आत्मा म्हणणे’, हे अजित पवार यांच्या गटाला पटते का? याचे स्पष्टीकरण द्यावे. या निवडणूकीत मराठी माणसे “भटकता आत्मा” कशाला म्हणतात, हे मतदानात दाखवून देतीलच, असे देखील त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.