Ganpat Gaikwad Arrest – उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाडसह तिघांना अटक

भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरात भर पोलीस ठाण्यातच मिंधे गटाचा शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांवर हिललाईन पोलिसांनी गोळीबार आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शुक्रवारी रात्री उल्हासनगरमधील पोलीस स्थानकामध्ये हा गोळीबाराचा प्रकार घडला. गणपत गायकवाड यांनी पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्येच चार गोळ्या झाडल्या, त्यातील दोन गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या तर दोन गोळ्या त्यांच्या अंगरक्षकांना लागून ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस स्थानकात गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली. अटकेतील तिघांना सुरक्षेच्या दृष्टीने ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. जागेच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महाराष्ट्रात जे सुरुय तीच खरी ‘मोदींची गॅरंटी’, भाजप आमदाराने केलेल्या गोळीबाराच्या घटनेवर वडेट्टीवर यांची प्रतिक्रिया

जमिनीच्या वादातून गोळीबार

आमदार गणपत गायकवाड आणि मिंधे गटाचे महेश गायकवाड यांच्यात द्वारली गावातील एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. गेल्या चार दिवसांपासून हा वाद विकोपाला गेला होता. महेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की केली. त्याची तक्रार देण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्या पाठोपाठ महेश गायकवाड त्यांच्या गुंडांसह पोहोचले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासमोर दोन्ही गट बसलेले असताना त्यांच्यात राडा झाला आणि गणपत गायकवाड यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून महेश गायकवाडवर गोळीबार केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रभर गुन्हेगारच पैदा होतील!

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचे राज्य करण्याचे प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. शिंदे यांनी माझे लाखो रुपये खाल्ले. मला मनस्ताप झाला म्हणूनच मी फायरिंग केली. गोळय़ा झाडल्याचा मला काहीही पश्चाताप नाही. माझ्या मुलाला पोलिसांच्या समोर मारत असतील तर मी काय करणार? पोलिसांनी डेअरिंग करून मला पकडलं त्यामुळे तो वाचला. एकनाथ शिंदेंनी दुसऱयांचे आयुष्य खराब करायला घेतले आहे. शिंदे यांनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रभर पाळले आहेत, अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली. एकनाथ शिंदे हे भाजपशीही गद्दारी करण्याच्या तयारीत आहेत, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे मुडदे पाडलेत; संजय राऊत यांचा मिंधे सरकारवर हल्लाबोल