कोल्हापूर शहरातील 28 हजारांवर विद्यार्थ्यांना ‘कोव्हॅक्सीन’चे डोस

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता महापालिका हद्दीत 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून शहरातील 133 शाळा व महाविद्यालयांत जाऊन तब्बल 28 हजार 896 विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 133 शाळा, महाविद्यालयांतील सुमारे 29 हजार 896 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत आणि महाविद्यालयात जाऊन आवश्यक यंत्रणेसह लसीकरण करण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घराजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय विद्यार्थी पटसंख्या अधिक असलेल्या शाळा, महाविद्यालयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दररोज सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांत लस देण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांतही दररोज 400 ते 500 विद्यार्थ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला एक नोडल अधिकारी नियुक्त केला असून, त्यांच्यावर लसीकरण शिबिराचे नियोजन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, शहरात 60 वर्षांवरील 68 हजार 700 ज्येष्ठ नागरिक, 30 हजार 55 हेल्थ केअर तसेच फ्रंटलाइन वर्कर्सना 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहेत. दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्यांना हा बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचेही प्रशासक बलकवडे यांनी सांगितले.

सोलापुरातील 90 हजार विद्यार्थ्यांना लस देणार

सोलापूर महापालिकेकडून 15 ते 18 वयोगटातील 90 हजार मुलांना कोवॅक्सीनचा डोस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर लसीचा बूस्टर डोस तीन घटकांतील नागरिकांना देण्यात येणार आहे. 1 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांनाही जापनीज इन्सिलेपसिस या आजारासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. 3 ते 21 जानेवारी या दरम्यान याने 1 लाख 82 हजार मुलांना ही लस देण्यात येईल. सर्व शाळांमध्येही लसीकरण करण्याबाबत तयारी सुरू असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले.