Lok Sabha Election ः जेपी नड्डांनी आपल्यासोबत अनेक बॅगा आणल्या, निवडणुकीच्या ठिकाणी वाटल्या; तेजस्वी यादव यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. नड्डा यांच्या बिहार दौऱ्यावरून तेजस्वी यादव यांनी निशाणा साधला आहे. ‘जे. पी. नड्डा हे बुधवारच्या दौऱ्यात बऱ्याच बॅगा घेऊन आले होते. जिथे निवडणुका होणार आहेत तिथे त्यांनी त्या वाटल्याचा आहेत. वाटल्यास त्या बॅगा तपासा’, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

जे. पी. नड्डा बुधवारी बिहारच्या भागलपूर, खगडीया आणि झंझारपूरमध्ये निवडणूक प्रचार सभांसाठी आले होते. या सभांमधून त्यांनी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. आता तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपवर पलटवार केला आहे. ‘भाजपबाबत लोकांच्या मनात रोष असल्याने जे. पी. नड्डा घाबरले आहेत. शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत इंडिया आघाडी पाचही जागांवर जिंकेल, असा विश्वास तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला.  नड्डांच्या दौऱ्यात घडलेल्या प्रकाराची चौकशी व्हायला हवी. तसेच केंद्रीय तपास यंत्रणाही अशाप्रकारच्या कृत्यांचे समर्थन करताना दिसताहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

देशात मंगळसूत्र विषयावरून तेजस्वी यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुलवामा पीडितांच्या महिलांचे मंगळसूत्र हिरावून घेण्यास कोण जबाबदार आहे? विवाहीत स्त्री पतीच्या दिर्घायुष्यासाठी गळ्यात मंगळसूत्र घालते. ही सर्व लोकं जाणतात की पुलावामा दुर्घटनेसाठी कोण जबाबदार होते, असे ते पुढे म्हणाले.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात थेट लढत आहे. विशेष म्हणजे राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव पूर्णियामधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. कारण आरजेडीने ही जागा काँग्रेससाठी सोडली नव्हती. निवडणूक लढवण्यासाठी पप्पू यादव यांनी नुकताच आपला जन आधार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. ‘इंडिया आघाडी संविधान वाचवण्यासाठी लढत आहे तर, नागपुरातील आरएसएस मुख्यालयात तयार केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा एनडीएचा मानस आहे’, असा हल्लाबोल तेजस्वी यादव यांनी केला.