पंतप्रधान मोदी हे तर आठवडामंत्री! शरद पवार यांचा हल्लाबोल

सत्ता ही समाजाच्या विकासासाठी वापरायची असते. मात्र, कांदा निर्यातबंदी, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन जाणे, तपास यंत्रणांचा गैरवापर, चांगले काम करणाऱया मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकणे या सर्व घटना पाहिल्यानंतर देश हुकूमशाहीकडे चालला असल्याचे दिसत आहे. भाजपकडून गॅरंटी…गॅरंटी म्हणून सांगितले जात आहे; पण लोकशाही संस्था उद्ध्वस्त करणे हीच मोदी गॅरंटी असल्याचा हल्लाबोल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडय़ाला महाराष्ट्रात येत असून, ते पंतप्रधान नाही, तर आठवडामंत्री झाले आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित सभेत शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, माढय़ाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रुपनवर, उत्तम जानकर, मेहबूब शेख, सांगोल्याचे डॉ. अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख, शिवसेनेचे साईनाथ अभंगराव, प्रवीण गायकवाड, आप्पासाहेब देशमुख, संजय घाटणेकर, बाबाराजे देशमुख, मीनल साठे, दादासाहेब साठे, बाळासाहेब धाईंजे, भूषणसिंहराजे होळकर, नितेश कराळे आदी उपस्थित होते.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराने देशात दडपशाही सुरू आहे. विकासाच्या नावाखाली सामान्य जनता व शेतकऱयांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत शरद पवार म्हणाले, मी वयाच्या 26 व्या वर्षी आमदार, 29व्या वर्षी मंत्री, तर 37व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनलो. सत्ता ही समाजाच्या विकासाठी वापरायची असते. सध्या विधायक गोष्टींकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नाही, असे सांगत वर्षातून कधीतरी येणारे पंतप्रधान मोदी आठवडय़ाला महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे ते पंतप्रधान नाही, तर आठवडामंत्री झाले आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

विकासाबाबत बोलताना पवार म्हणाले, महाराष्ट्रासाठी मंजूर असलेले नवीन उद्योग व रोजगाराची साधने गुजरातमध्ये नेली जात आहेत. गुजरात हा आमचा भाऊ आहे. गुजरातचा विकास व्हायला हवा; पण एका भावाचा विकास होत असताना दुसऱया भावाच्या घरादाराचा लिलाव करण्याचे काम मोदी सरकारच्या काळात होत आहे. देशातील शेतीमाल किंवा साखर निर्यात केली, तर अर्थव्यवस्था सुधारते. पण, या सरकारने शेतकऱयांना प्रोत्साहन देण्याऐवजी निर्यातबंदी करून आयात सुरू केली. त्यामुळे अशा लोकांच्या हातात पुन्हा सरकार देणं हिताचं नाही, असे आवाहन पवार यांनी केले.

सोलापूर जिह्याचे नेतृत्व विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केले, तेव्हा जिह्यातील उजनीच्या पाण्याची, जिल्हा परिषदेतील प्रश्नांची, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी केलेल्या कार्याची आठवण आणि पुन्हा ते दिवस आणण्यासाठी जनतेने मला उमेदवारीसाठी प्रेरित केले, असे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

अजित पवार गंगेऐवजी गटाराचे पाणी प्यायला गेले – उत्तम जानकर

अकलूज येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  अजित पवार यांचा ‘एक नवीन पोपट बोलू लागल्याचा’ उपरोधिक टोला उत्तम जानकर यांच्या दिशेने मारला होता. त्यावर जानकर यांनीही उत्तर देत, ‘संघर्ष माझ्या रक्तात आहे. तो संघर्ष अजित पवार यांच्यासारखा नाही. गंगेच्या पाण्याऐवजी ते गटाराचे पाणी प्यायला गेल्याचा टोला उत्तम जानकर यांनी लगावला.

माढय़ाचा हिसका कळला – जयंत पाटील

n माढा मतदारसंघातील जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याने माढय़ाचा हिसका त्यांना कळला. त्यामुळेच फडणवीस यांना पाच सभा, तर पंतप्रधान मोदी यांनाही या मतदारसंघात सभा घ्याव्या लागल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर चक्क न्यायालयानेच बँकेला फटकारले. माढा मतदारसंघात मोहिते-पाटील व जानकर यांचा फॅक्टर दीड ते दोन लाख मताधिक्य देणार, असे जयंत पाटील यांनी सांगितले.