कैद्याच्या पोटात सापडला फोन

प्रातिनिधीक फोटो

कर्नाटकातील शिवमोग्गा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या पोटातून चायनीज फोन काढला. कैदी परशुराम (28) असे या कैद्याचे नाव आहे. या कैद्याला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला बंगळुरूच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात पाठवण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी त्याच्या पोटातून चायनीज फोन आणि सिमकार्ड काढले. पोलिसांच्या तपासणीत पकडले जाण्याच्या भीतीने परशुरामने फोन आणि सिमकार्ड गिळल्याचे डॉक्टरांना सांगितले. मोबाईल 20 दिवस पोटात होता, दुखणे वाढले तेव्हा दवाखान्यात दाखल केले.

कैद्याचा अंदाज चुकला

फोन इतका छोटा होता की, परशुरामने तो सहज गिळला, फोन फूड पाईपमध्येही अडकला नाही, तर लहान आतडय़ात अडकला, असे डॉक्टरांनी सांगितले. शौच करताना पोटातून पह्न येईल, असे परशुरामला वाटले होते, पण तसे झाले नाही. त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे हळूहळू त्याची प्रकृती ढासळू लागली होती, अखेर जास्त त्रास जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉक्टर म्हणाले.

पुन्हा तुरुंगात रवानगी

डॉक्टरांनी परशुरामवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. कारागृहात मोबाईल पह्न तस्करी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहात मोबाईल, ड्रग्ज आणि इतर गोष्टींची सतत झडती घेतली जाते. पण परशुरामने ते गिळले होते.