2 महिन्यात 2.5 लाख रुपयांची कमाई, इंदूरमध्ये भिकारी महिलेच्या चौकशीतून बाहेर आली धक्कादायक माहिती

जमीन , दुमजली घर, दुचाकी, 20 हजार रुपयांचा मोबाईल आणि 2 महिन्यात 2.5 लाखांची कमाई करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. भीक मागून या महिलेने इतकी सगळी माया गोळा केल्याचे कळाल्यानंतर पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत. ही महिला तिच्या मुलीलाही भीक मागायला लावत होती. इंद्रा बाई असं या महिलेचे नाव आहे. तिच्यावर पोलिसांनी भीक मागणे आणि लहान मुलांवर भीक मागण्यासाठी जबरदस्ती करणे हे आरोप लावत अटक केली आहे.

पोलिसांनी इंद्रा बाईला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता तिला एका आठवड्याची पोलीस कोठडी देण्यात आली. तिच्या मुलीला एका लहान मुलांची देखभाल करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या हवाली केलं आहे. इंद्रा बाईने आपल्या बचावामध्ये म्हटले की, उपाशी मरण्यापेक्षा भीक मागणे परवडतं, त्यामुळे मी भीक मागायला सुरुवात केली होती. इंद्रा बाईच्या 7 वर्षांच्या मुलीला ताब्यात घेऊन सामाजिक संस्थेच्या हवाली केले जात असताना इंद्रा बाईने हुज्जत घालत जाम तमाशा केला होता.

इंदूरमधील भिकाऱ्यांचे पुनर्वसन करणाऱ्यासाठी एका सामाजिकर संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेने 38 चौकातील 7 हजारांहून अधिक भिकाऱ्यांची माहिती गोळा केली आहे. यामध्ये 50 टक्क्यांहून अधिक भीक मागणारी ही मुले आहेत. माहिती गोळा करणाऱ्या संस्थेचे म्हणणे आहे की इथल्या भिकाऱ्यांची एकत्रित वार्षिक कमाई ही 20 कोटींच्या आसपास असते.

इंद्रा बाई हिला एकूण 5 मुले आहेत. तिने पाचही मुलांना भीक मागण्याच्या कामाला लावले आहे. तिने भीक मागण्यासाठीची ठिकाणेही हुशारीने निवडली होती. उज्जैनला ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जाणारे भाविक सर्वाधिक असलेल्या रस्त्यावर तिने आपल्या मोठ्या मुलांना उभे करण्यास सुरुवात केली होती. ‘महाकाल लोक’चे निर्माणकार्य झाल्यानंतर इथल्या भाविकांची संख्या वाढली असून पूर्वीच्या 2500 भाविकांच्या तुलनेत आता इथे 1.75 लाख भाविक दर दिवसाला येतात.

इंद्राला तिच्या मुलीसोबत भीक मागत असताना पकडल्यानंतर तिचा नवरा आणि तिची दोन्ही मुले पळून गेली. पोलिसांनी इंद्रा बाईकडून 19600 रुपये जप्त केले. तिने चौकशीदरम्यान सांगितले की 45 दिवसांत तिने घरच्यांसोबत मिळून 2.5 लाख रुपये गोळा केले होते. इंद्रा बाई हिने राजस्थानच्या कोटाजवळ दुमजली घर घेतले असून तिथेच एक शेतजमीन घेतली आहे. इंद्रा बाईकडे चांगला मोबाईल असून ती आणि तिचा नवरा बाईकवरून फिरायचे.