नॉन क्रिमिलेअरमुळे राज्य सेवा उमेदवारांना फटका, तारखेच्या अटीमुळे काही उमेदवार अपात्र

नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घातलेल्या तारखेच्या अटीमुळे राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीत काही उमेदवार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे या उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.

एमपीएससीतर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू आहे. राज्यसेवा 2021 चे अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 2 नोव्हेंबर 2021 होती. उमेदवारांनी या तारखेच्या पूर्वीचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते, मात्र मुलाखतीवेळी काही उमेदवारांनी या मुदतीनंतरचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे एमपीएससीकडून मुदतीनंतरची प्रमाणपत्रे अवैध ठरविण्यात आली. परिणामी संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये सर्व नियम आणि अटी स्पष्टपणे नमूद केलेले होते. त्यानुसारच कार्यवाही करण्यात आल्याचे स्पष्टीकरण एमपीएससीच्या अधिकाऱयांनी दिले.

पोलीस भरतीसाठी राज्य सरकारने नॉन क्रिमिलेअर प्रमाणपात्रच्या तारखेची अट शिथिल केली आहे. 2021 च्या राज्यसेवेच्या जाहिरातींवेळी कोरोना काळ असल्याने अनेक उमेदवारांना मुदतीत प्रमाणपत्रे उपलब्ध होऊ शकली नाहीत. याचा विचार करून उमेदवारांचे नुकसान होऊ नये यादृष्टीने एमपीएससीनेही हा नियम शिथिल करण्याची मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईटचे महेश बडे यांनी केली आहे.