ओमायक्रोनने पाचर मारली; मैदाने, उद्याने, चौपाटय़ांवर नो एण्ट्री… नव्या वर्षाच्या पाटर्य़ा घरात, पण जोरात

 

राज्य सरकारच्या निर्बंधांनंतर नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्याच्या विचारात असलेल्या जनतेच्या उत्साहाला आज ओमायक्रोनच्या धोक्यामुळे पाचर मारली गेली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध लागू केले असतानाच आता गर्दी होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनीही 31 डिसेंबरच्या सायंकाळपासून ते 15 जानेवारीपर्यंत सार्वजनिक ठिकाणी नो एण्ट्री लागू केली. यानुसार सायंकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत मैदाने, समुद्रकिनारे, चौपाटय़ा अशा ठिकाणी गर्दी तर सोडाच प्रवेशासही मनाई करण्यात आली आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ओमायक्रोनचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे गर्दी रोखण्यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम तसेच लग्नसोहळ्यांत केवळ 50 लोकांच्या  उपस्थितीला परवानगी दिली. अंत्ययात्रेतही 20 जणांच्या सहभागाचे निर्बंध लादण्यात आले. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनालाही अधिकचे निर्बंध लागू करण्याचे अधिकार दिले. याचे पालन करताना मुंबई पोलिसांनीदेखील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी नवीन नियमावली जारी केली. ही नियमावली 31 डिसेंबरच्या दुपारी 1 वाजल्यापासून 15 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. रुग्णसंख्येत वाढ होत राहिल्यास त्यापुढेही हे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत.

कडक कारवाई

राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आता मुंबईत 15 जानेवारीपर्यंत मैदाने, गार्डन, समुद्रकिनारे, चौपाटय़ा येथे नेमून दिलेल्या वेळेत या ठिकाणांवर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. इथे पोलिसांची नजर राहणार असून निर्बंध न पाळणाऱ्यांवर सरकारी नियमांनुसार कडक कारवाई केली जाणार आहे.