Lok Sabha Election 2024 : नाशिकमधून महायुती छू मंतर? मिंध्यांचे फक्त नंतर नंतर

सामना ऑनलाईन, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जागावाटप आणि प्रचारमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. विविध मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करून प्रचाराचा जोरदार धडाका महाविकास आघाडीने लावला आहे. सोमवारी नाशिक मतदारसंघात याचाच प्रत्यय आला. एकिकडे महाविकास आघाडीच्या नाशिकच्या उमेदवाराने अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे महायुतीत मात्र या जागेसाठी अद्याप उमेदवारी घोषित झालेली नाही. दरम्यान, महायुतीच्या उमेदवारावरून विचारलेल्या प्रश्नावर मिंधेंचं नंतर नंतर इतकंच उत्तर येत असल्याने नाशिकमधून महायुती छूमंतर होणार, अशी चर्चा नाशिककरांमध्ये रंगली आहे.

सोमवारी नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला. मात्र, अद्याप नाशिकमध्ये महायुतीने उमेदवार मात्र दिलेला नाही. उमेदवारी अर्ज भरून प्रचाराचा धडाका लावण्यात महाविकास आघाडी एक पाऊल पुढे आहे तर नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढत चालला आहे. या जागेवर अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपने दावा केला आहे. त्यात अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत माघार घेण्याची तयारी कुणीही दाखवलेली नाही. शिंदे गटाकडून हेमंत गोडसे, अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचा दावा असून भाजपनेही ताकद लावली आहे.

26 एप्रिल ते 3 मे अशी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे. 29 एप्रिल उजाडूनही अद्याप महायुतीने नाशिकसाठी उमेदवारी जाहीर केलेली नाही. या तिढ्यावरून छगन भुजबळ यांनी ’20 मे या नाशिक लोकसभेच्या मतदानाच्या दिवसापर्यंत तरी उमेदवार जाहीर करावा, असा टोला महायुतीलाच लगावला होता. दरम्यान, शांतिगिरी महाराज यांनी मिंध्यांकडून अर्ज दाखल केल्याचा दावा केला होता. यावरून माध्यमांनी राहुल शेवाळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोबत दाखल झालेल्या मिंध्यांना प्रश्न विचारला. मात्र, नाशिकच्या जागेविषयी नंतर बोलतो म्हणून माध्यमांचे प्रश्न टाळायचा प्रयत्न केला. महायुतीच्या उमेदवारी घोषणेची ही बिरबलाच्या खिचडीसारखी अवस्था पाहून आता नाशिककरांमध्ये नाशिकमधून महायुती छू मंतर होतेय का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे अतिशय साधा सरळ आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून राजाभाऊ वाजेंना लोकप्रियता मिळताना दिसत आहे.