आहे त्याच ठिकाणी पुनर्वसनाची लेखी हमी द्या, नाहीतर एकही रहिवासी घर सोडणार नाही! माहीमच्या शाहू नगरवासीयांचा ठाम निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी घरे खाली करण्याच्या महापालिकेने बजावलेल्या नोटिसा माहीमच्या राजर्षी शाहू नगरातील रहिवाशांनी धुडकावून लावल्या आहेत. ‘पुनर्विकासाला आमचा अजिबात विरोध नाही, पण आहे त्याच भागांत आम्हाला घर मिळायला हवे. तशी लेखी हमी संबंधितांनी द्यावी, अन्यथा एकही रहिवासी घर सोडणार नाही,’ असा निर्धारच शाहू नगर म्युनिसिपल बिल्डिंग्ज भाडेकरू कल्याणकारी संघाने केला आहे.

माहीम पूर्वेला रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या महापालिकेच्या जागेवर शाहू नगर वसाहत उभी आहे. तीन आणि चार मजल्यांच्या 47 इमारती येथे असून सुमारे 1047 कुटुंबे तिथे वास्तव्यास आहेत. चौदा एकर परिसरात असलेली ही वसाहत मैदाने, उद्याने, मोकळ्या जागा, व्यायामशाळा आणि पोलीस ठाणे अशा सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. असे असतानाही या वसाहतीचा पुनर्विकास धारावी प्रकल्पाच्या माध्यमातून केला जाणार आहे. मात्र पुनर्विकास करताना येथील रहिवाशांना झोपडपट्टीचे निकष लावून नवी घरे दिली जाणार आहेत. त्यात त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी त्यास विरोध दर्शवला आहे.

किती वेळा विस्थापित करणार?

‘दादर-प्रभादेवीसारख्या भागातून विस्थापित होऊनच आमचे आई-वडील या ठिकाणी आले होते. तेव्हा येथे काहीच सुविधा नव्हत्या. दलदल, चिखल तुडवत आम्ही येथे लहानाचे मोठे झालो. आता सगळे व्यवस्थित असताना पुन्हा विस्थापित केले जात आहे. हा अन्याय आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातूनही हे चुकीचे आहे. आम्हाला किती वेळा विस्थापित करणार,’ असा सवाल संघाचे लक्ष्मण फणसगावकर व प्रफुल्ल घोलप यांनी केला.

रहिवाशांच्या मागण्या

 आहे तिथेच घरे द्या
 नवी घरे देताना बीडीडी, बीआयटीचे निकष लावा
 पुनर्विकासाचा आराखडा दाखवा
 आमच्याशी रीतसर करार करा

…तर आम्हाला डीआरपीतून वगळा

आम्हाला विस्थापित करण्याचा हा डाव आहे. पुनर्विकास करायचाच असेल तर आम्हाला बीडीडी आणि बीआयटी चाळींतील रहिवाशांप्रमाणे निकष लावून नवी घरे द्या. ते जमत नसेल तर धारावी पुनर्विकास प्रकल्पातून (डीआरपी) आमची वसाहत वगळा. अनेक वसाहती अशा पद्धतीने वगळण्यात आल्या आहेत. तोच न्याय आम्हालाही लावा, अशी मागणी संघाचे अध्यक्ष भरत राऊळ यांनी केली.