मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला, दोन गटांत झालेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू

मे महिन्यापासून ईशान्येकडील मणिपूर या राज्यात उफाळलेला हिंसाचार थांबायचं नाव घेताना दिसत नाही. सोमवारीही त्यात अजून काही हिंसाचाराच्या घटनांची भर पडली असून त्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या निमित्ताने केंद्र सरकारची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

मणिपूरमधील तेंगनोउपल जिल्ह्यात सोमवारी दुपारी दोन गटांत गोळीबार झाला. या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला. येथील लेतीथू गावात हा हिंसाचार उफाळला. या गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत 13 जणांचा बळी गेला होता. गंभीर म्हणजे, या मृतदेहांशेजारी कोणतीही शस्त्रं आढळली नाहीत.

मृत्युमुखी पडलेले लोक हे स्थानिक रहिवासी नसावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हे लोक कुठूनतरी आले आणि गोळीबारात सहभागी झाले, असंही पोलिसांचं म्हणणं आहे. अद्याप मृतांपैकी कुणाचीही ओळख पटलेली नाही.