Manipur violence – सैनिकाच्या आईसह कुटुंबातील तिघांचे अपहरण, वडिलांची सुटका; गोळीबारात पोलिसांसह 9 जखमी

मणिपूर शांत असल्याच्या बाता केंद्र सरकार मारत असले तरी येथे सातत्याने हिंसाचाराच्या घटना होत आहेत. ताजी घटना मणिपूरच्या कांगपोकपी (Kangpokpi) जिल्ह्यातील कांगचुप चिंगखोंग (Kangchup Chingkhong) गावाजवळ घडली असून येथे चौघांचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरण झालेल्या चौघांपैकी तीन जण सैनिकाच्या कुटुंबातील सदस्य आहेत. यात सैनिकाच्या वयोवृद्ध आईचाही समावेश आहे. हे सर्व कुकी समाजाचे असून मैतेई समाजाच्या लोकांनी एका चेकपॉइंटवरून त्यांचे अपहरण केले.

आपल्या समाजाच्या लोकांचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच कुकी समाजाचे लोक हातात शस्त्र घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कांगचुप चिंगखोंग गावाजवळील चेकपॉइंटच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारामध्ये दोन पोलिसांसह एकूण 9 जण जखमी झाले आहेत. यात एका महिलेचाही समावेश असून जखमींना राजधानी इंफाळमधील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

एका लष्करी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, कुकी समाजाची पाच लोक चुराचांदपूर येथून कांगपोकपी येथे जात होते. त्यांची गाडी कांगचुप चिंगखोंग गावाजवळ आल्यानंतर मैतेई समाजाच्या लोकांना त्यांना अडवले आणि त्यांच्यावर हल्ला करत अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र चेकपॉइंटवरील जवानांनी एका 65 वर्षीय वृद्धाची सुटका केली आहे. इतर चौघांना मात्र सोडवण्यात यश आले नाही.

मणिपूरमध्ये दोन तरुण बेपत्ता, पुन्हा तणावाचे वातावरण

जवानांनी अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सोडवलेल्या 65 वर्षीय वृद्धाचे नाव मांगलून हाओकीप (Manglun Haokip) असून हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना नागालँडमधील दिमापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर नेंगकिम (60), नीलम (55), जॉन थांगजिम हाओकिप (25) आणि जामखोटांग (40) अशी अपहरण झालेल्या चार जणांची नावे आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.