जरांगे यांचे उपोषण मागे, आंदोलन सुरू

चाळीस दिवसांत आरक्षण देण्याच्या वायद्यावर मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सतराव्या दिवशी सुटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्युस घेऊन त्यांनी गुरुवारी आपल्या आंदोलनाची सांगता केली आणि सरकारचा जीव भांडय़ात पडला! मात्र आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

29 ऑगस्टपासून जालना जिह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले होते. उपोषण सुरू झाल्यानंतर चौथ्या दिवशीच लाठीहल्ला करून ते दडपण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी महिला, वृद्ध व लहान मुलांनाही बेदम झोडपले. यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आंदोलन अधिक तीव्र केले. आंतरवाली लाठीहल्ल्याचे संपूर्ण राज्यात संतप्त पडसाद उमटले. ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाल्याने सरकारची कोंडी झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, आमदार राजेश टोपे, नारायण कुचे, मिंधे गटाचे अर्जुन खोतकर आदी सकाळी 11 वाजता उपोषण स्थळी दाखल झाले. मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे हेदेखील उपोषणात सहभागी झाले होते. त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोघांनीही ज्युस घेऊन उपोषण संपवले.

जुनीच रेकॉर्ड वाजवली

या वेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनीच रेकॉर्ड वाजवली. राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. हे रद्द झालेले आरक्षण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नरत असून त्यासाठी काही काळ लागणार आहे, असे ते म्हणाले. आरक्षणासंदर्भात नेमण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीत मनोज जरांगे पिंवा त्यांच्या कार्यकर्त्याने यावे, असे आवाहनही त्यांनी केले. लाठीहल्ला दुर्दैवी असून त्याबद्दल मी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. जी-20 परिषदेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोज जरांगे कोण आहेत, असे विचारले. त्यावर मी तो सामान्य माणूस असून त्याचे आंदोलन गाजत असल्याचे सांगितले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला जागावे

मराठा आरक्षण हे केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच देऊ शकतात. त्यामुळेच मराठा समाजाला प्रामाणिक राहून मी सरकारला एक महिना आणि वर 10 दिवसांची मुदत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला जागावे आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. आज उपोषण मागे घेत असलो तरी आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळ आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, अशी अट मनोज जरांगे यांनी घातली होती. मात्र आज मुख्यमंत्री आणि चार मंत्रीच उपोषण स्थळी आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजही आले नाहीत. विशेष म्हणजे अजित पवार गटाचा एकही मंत्री नव्हता.

गद्दारी माझ्या रक्तात नाही! मिंध्यांसमोरच जरांगेंनी ठणकावले

पेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या एका चिठ्ठीवरून संशय निर्माण झाला होता. त्याबाबत खुलासा करताना मनोज जरांगे यांनी ‘‘मी कुणाच्याही सांगण्यावरून आंदोलन करत नाही. तुमच्या राजकारणासाठी आमचा बळी घेऊ नका. गद्दारी माझ्या रक्तात नाही,’’ असे मिंध्यांसमोरच ठणकावून सांगितले.

सरसकट कुणबी दाखले नकोत! – भाजप

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळावेत ही 96 कुळी मराठय़ांची मागणी नाही, असा दावा भाजपा नेते व पेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केला. मराठय़ांना सरसकट कुणबी दाखले देऊ नका, राज्य सरकारने घटनेतील 15 (4) या कलमाचा अभ्यास करावा. त्यानुसार मराठय़ांना स्वतंत्रपणे आरक्षण देता येईल. राज्यात 38 टक्के मराठा समाज गरीब असून त्यांना आरक्षणाची गरज आहे. ज्याला इतिहासाची जाण आहे त्यानेच  यावर बोलावे. यापूर्वी जी आरक्षणे दिली तेव्हा मराठेच मुख्यमंत्री होते. आता मराठा आरक्षण देताना द्वेषाची भावना असू नये, असे राणे म्हणाले.

आता ओबीसी तरुणांचे उपोषण सोडवावे – वडेट्टीवार

मनोज जरांगे यांचे उपोषण सुटल्याचा आनंद आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात ओबीसी तरुणांचे उपोषणही सोडवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. आता आरक्षण देण्याच्या आश्वासनाची पूर्तता सरकारने करावी आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही याची ग्वाहीही द्यावी, असे वडेट्टीवार म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाज विरोध करत नाही. मात्र मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. निवडणुकीला आठ महिने शिल्लक आहेत. तोवर आरक्षण देतात की तोंडाला पाने पुसतात हे पहावे लागेल, असेही ते पुढे म्हणाले.