मुंबई – सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड, मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी

मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण आहे असं म्हणत आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या इमारतीखाली उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या गाड्या सदावर्ते यांच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मंगेश साबळे यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोघांनी सदावर्ते राहात असलेल्या क्रिस्टल टॉवर इमारतीखाली गाड्यांच्या काचा फोडल्याचे वाहिन्यांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये दिसत आहे. या दोघांनी काचा फोडत असताना एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही दिल्या.

या प्रकाराचा सदावर्ते यांनी निषेध केला आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बुधवारपासून पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. ‘जरांगेला अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा. एकट्या जरांगेचे ऐकायचे नाही, आमचेही ऐकले पाहिजे. जरांगेचे लाड थांबवले नाही तर मीही उपोषण करेन. हे आरक्षण मिळणे अशक्य आहे.’ असे सदावर्ते यांनी म्हटले.