आठ समुद्री चाचांचा अल्पवयीन असल्याचा दावा खोटा

नौदलाच्या जवानांनी धडक कारवाई करत पकडल्यानंतर येलोगेट पोलिसांच्या ताब्यात आल्यावर आम्ही अल्पवयीन आहोत असा दावा करणाऱया आठ समुद्री चाचांचा खोटेपणा उघड झाला आहे. वैद्यकीय अहवालात ते सर्व वयाने 18 वर्षे पूर्ण केलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अरबी समुद्रात दहशत माजवणाऱया 35 समुद्री चाच्यांना नौदलाच्या ‘आयएनएस कोलकाता’ युद्धनौकेवरील जवानांनी  पकडले होते. त्या सर्वांना पकडून नौदलाने कायदेशीर कारवाईसाठी येलोगेट पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यापैकी आठ चाच्यांनी शक्कल लढवत आम्ही अल्पवयीन आहोत असा दावा केला होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार त्या आठ चाच्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचे दात व हाडांच्या तपासणीवरून त्यांचे वय जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून शिक्षेत सूट मिळविण्यासाठी त्या आठ चाच्यांनी अल्पवयीन असल्याचा केलेला दावा खोटा ठरला आहे. वैद्यकीय अहवालानुसार ते आठही चाचे 18 वर्षे पूर्ण केलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.