
जूनमध्ये ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये धुवाधार बरसलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र दडी मारली आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असून फक्त तुरळक सरी बरसतील असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. ऑगस्टअखेरपर्यंत पावसाची 54 टक्के तूट असल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
ऑगस्टमध्ये मध्य महाराष्ट्र वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला नाही. यातच सद्यस्थितीत राज्यातील हवामानाची स्थिती मुसळधार पावसासाठी अनुकूल नाही. त्यामुळे तुरळक श्रावणसरी बरसतील असाच अंदाज आहे. मात्र कोकणासह मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यांत पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट नाही.




























































